लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सचिन वाझेवरील आराेप सिद्ध करण्यासाठी एनआयएने त्याच्या तत्कालीन सहकाऱ्याकडे चौकशी सुरू ठेवली आहे. सहायक निरीक्षक रियाज काझी व प्रशांत ओव्हाळ यांच्यासह चौघांची सातत्याने चौकशी करण्यात येत आहे. शनिवारीही त्यांची सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली.
वाझे हा चौकशीत एनआयएच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करीत नसून अनेक प्रश्नांची नकारात्मक उत्तरे देत असल्याने मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागातील (सीआययू) त्याच्या तत्कालीन सहकाऱ्यांकडून तपास यंत्रणा माहिती घेत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वाझेकडे त्याबद्दल विचारणा करून अधिक तपशील मिळविला जात आहे. अधिकाऱ्यांनी त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती कथन केल्यानंतर वाझेला धक्का बसून तो त्याबाबत स्पष्टीकरण देतो, त्यातून अनेक उलगडे होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रियाज काझी व प्रशांत ओव्हाळ यांच्याकडून वाझेच्या कार्यपद्धतीबद्दल तपास यंत्रणेला अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांना सरकारी साक्षीदार बनविले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
.....................