वृद्धांची फसवणूक करणा-याला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:39 AM2017-08-19T05:39:21+5:302017-08-19T05:39:23+5:30
जवळचे नातेवाईक असल्याचे सांगून घरात घुसणा-या आणि वृद्धांचा विश्वास संपादन करून घरातील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारणा-या ५१ वर्षांच्या ठगाला दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : वृद्धांची माहिती गोळा करायची. त्यानंतर ते घरात एकटे असताना जवळचे नातेवाईक असल्याचे सांगून घरात घुसणा-या आणि वृद्धांचा विश्वास संपादन करून घरातील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारणा-या ५१ वर्षांच्या ठगाला दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्रभादेवी येथील लक्ष्मी नारायण सोसायटीत ८६ वर्षांच्या लक्ष्मी पाताडे या मुलगा, सून, १६ वर्षांच्या नातवासोबत राहत होत्या. १२ जुलैला सकाळी पावणेअकराच्या सुमारास ठगाने सुनेच्या ओळखीचा असल्याचे सांगून घरात प्रवेश केला. त्या वेळी आजी व नातू दोघेच घरात होते. जवळच लॅपटॉप स्वस्त मिळत असल्याचे सांगून त्याने नातवाला तेथे पाठविले. त्यानंतर आजीशी गोड बोलून त्यांच्यासारखेच दागिने आईला बनवायचे असल्याचे सांगितले. जवळच्या सोनाराला दागिने दाखवून पुन्हा आणून देतो, असे सांगून तो दागिने घेऊन बाहेर पडला. तो परतलाच नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाताडे यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दादर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तपासाअंती पोलिसांनी शुक्रवारी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध अशाप्रकारे फसवणुकीचे ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ७ लाख ९० हजार किमतीचे ३०० गॅ्रम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.