Join us

विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदी चैनसुख संचेती यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 7:09 PM

राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती यांची तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी योगेश जाधव यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मुंबई : राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती यांची तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी योगेश जाधव यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. याचबरोबर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त्यासाठी नावे जाहीर केली असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याप्रमाणे या चार पदांच्या नियुक्त्या घोषित करण्यात येत असून त्यानुसार आवश्यक पुढील कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी चैनसुख संचेती यांची तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी योगेश जाधव यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असलेल्या डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्री दर्जा देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे.

टॅग्स :मंत्रालयमहाराष्ट्र