मुंबई : डोक्यावर निळी टोपी-निळा फेटा, खांद्यावर धम्म ध्वज, पांढरेशुभ्र कपडे परिधान केलेल्या आबालवृद्धांचा भीमसागर शुक्रवारी चैत्यभूमीवर महामानवासमोर नतमस्तक होत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त आंबेडकरांची गौरवगाथा गात, त्यांच्या जयजयकाराच्या गगनभेदी भीमघोषणा देत भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीचे निमित्त साधून अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी राज्यासह देशाच्या विविध भागांतून लाखो भीमअनुयायी दादर चैत्यभूमीवर दाखल झाले. यंदा काही आंबेडकरी संघटनांनी ‘स्वयंसेवक सेवा अभियान’ राबवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या स्वयंसेवकांकडून प्रत्येक बाबीत शिस्त पाळली जात होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन करून गटागटाने लोक परतीची वाट धरत होते.सोमवारी मध्यरात्रीपासूनच भीमसैनिकांची मोठी वर्दळ चैत्यभूमीवर होती. चैत्यभूमीबरोबरच इंदू मिल, आंबेडकर भवन, वडाळ्याचे आंबेडकर महाविद्यालय आणि फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय तसेच हिंदू कॉलनीमधील बाबासाहेबांचे निवासस्थान अशा स्थळांच्या परिसरातही मोठी गर्दी झाली होती. दिवस उगवल्यानंतर या गर्दीत आणखी वाढ झाली. देशभरातून आलेल्या या जनतेला पाणी, चहा-नाष्टा पुरवण्याची सोय अनेक ठिकाणी विविध स्वयंसेवी तसेच सामाजिक संस्थांनी केली होती. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)घटनाकारांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादनभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६वी जयंती देशभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी मुख्य सचिव सुमीत मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तर, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी विधान भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विधान परिषद सदस्या नीलम गोऱ्हे, विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे, सचिव उत्तमसिंह चव्हाण आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महामानवास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.आंबेडकरी साहित्याची मागणी वाढतेयडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसागर लोटलेला दिसून येतो. या वेळी, चैत्यभूमीच्या परिसरात आंबेडकरी साहित्याच्या विक्रीचे अनेक स्टॉल्स दिसून येतात. शुक्रवारीही येथे डॉ. आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर या साहित्याच्या खरेदीसाठी भीम अनुयायींनी गर्दी केली. दिवसभरात या स्टॉल्सवर सुमारे दोन लाख पुस्तकांची विक्री झाली. यात डॉ. आंबेडकर यांचे चरित्र, विचार, बौद्ध धर्म आणि प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके आदी साहित्यास सर्वाधिक मागणी होती.चैत्यभूमी परिसरात नागपूर, पुणे, औरंगाबाद, जयपूर, दिल्ली अशा विविध ठिकाणांहून प्रकाशक येतात. लहानग्यांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील वाचक या आंबेडकरी साहित्याच्या खरेदीसाठी येत असल्याचे येथील विक्रेते सांगतात. या स्टॉल्सवर पुस्तकांसह झेंडे, शिल्प, तसबीर, मेणबत्ती आदी वस्तूही दिसून येतात. एका दिवसाची उलाढाल १० लाखांच्या घरात जाते, असा अंदाज विमल बौद्ध साहित्य विक्रेते साहेबराव केदारे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी दुपारपर्यंत १८ हजार रुपयांपर्यंतच्या पुस्तकांची विक्री झाल्याचे नागसेन बुक स्टॉलचे राजू उके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुंबई महानगरपालिका पुस्तक स्टॉल्सच्या जागा उपलब्ध करून देत नाही. आम्ही पुस्तक विक्रेते पालिकेला महसूल देण्यास तयार आहोत; तरीही महापालिका बुक स्टॉल्ससाठी परवाना देत नाही, अशी खंत उके यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ९९ स्पीच, भारतीय संविधान, चरित्र, मिलिंद प्रश्न या पुस्तकांना मागणी अधिक आहे.
चैत्यभूमीवर उसळला भीमसागर
By admin | Published: April 15, 2017 3:04 AM