मुंबई : दादरच्या चैत्यभूमी परिसराला ‘ओखी’ वादळाच्या धोक्याची सूचना दिल्यानंतरही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाण दिनी, महामानवास अभिवादन करण्यासाठी बुधवारी लाखो भीमसैनिक दादरमध्ये एकवटले होते. चैत्यभूमीपासूनसुरू झालेली अनुयायींची रांग वरळी सी-लिंकपर्यंत पोहोचली होती. अनेक गैरसोयींवर मात करत, भीमसागराने शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांना अभिवादन करत, चैत्यभूमीचा भावपूर्ण निरोप घेतला. दरम्यान, भूमिपूजन होऊनही गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या बाबासाहेबांच्या इंदू मिल येथील स्मारकावरून मात्र, राजकीय वर्तुळात वादंग उमटल्याचे चित्र दिसले.‘स्मारकाचे काम महिन्याभरात सुरू’महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाचे काम येत्या एक महिन्यात सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एक महिन्याच्या आत काम सुरू करण्यात येईल.डॉ. आंबेडकर यांच्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला. संविधानामुळे शक्तिशाली देश निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.दीन दलित, इतर मागासवर्गीय शेतकरी अशा शेवटच्या घटकापर्यंत परिवर्तनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शस्त्र दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करण्याचे कार्य करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चैत्यभूमीवर महामानवाला भीमसागराचे अभिवादन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 4:56 AM