Join us

चैत्यभूमीवर ते रात्र-रात्र जागले, लाखो अनुयायांसाठी राबतात 'सफेद वर्दीवाले'

By महेश गलांडे | Published: December 06, 2018 10:04 PM

चैत्यभूमीवर गेल्या 3 दिवसात जवळपास 25 लाखांपेक्षा अधिक भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर भीमसागर उसळल्याचे दिसले. पांढरा पोशाख, हातात बाबासाहेबांचे चित्र अन् कपाळी निळा नाम ओढून दादर स्थानकापासून ते चैत्यभूमीजवळील सागरापर्यंत हा भीमसैनिक पसरला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, या घोषणांनी दादरचा परिसर दणाणून गेला होता. चैत्यभूमीच्या पवित्र स्थानापासून ते 2 किलोमीटरपर्यंत अनुयायांची रांग लागली होती. या लाखो अनुयायांचे शिस्तीत अन् रांगेत दर्शन होण्यासाठी हजारो हात झटत होते. दिवसरात्र सेवा देणारे हे गणवेशधारी भीमसैनिक होते समता सैनिक दलाचे कार्यकर्ते. अनुयायांसाठी झटणारे हे सफेद वर्दीवाले चैत्यभूमीवर रात्र-रात्र जागले.

चैत्यभूमीवर गेल्या 3 दिवसात जवळपास 25 लाखांपेक्षा अधिक भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे साहजिक महाराष्ट्र पोलिसांवर जबाबदारी वाढली होती. पण, महाराष्ट्र पोलिसांचा भार हलका करण्याचं काम करत होते समता सैनिक दलाचे कार्यकर्ते. पायात काळा बुट अन् खाकी पँट, अंगावर पांढरा शर्ट, डोक्यावर निळी टोपी, शर्टावरील खांद्यावर SSD चा बिल्ला अन् हातात पोलिसांप्रमाणे दिसणारी काठी पाहून प्रत्येकाला वाटत होते की हे पोलीस कोण ? हे आपल्याला का आडवतायेत, हे का आपल्याशी भांडण करतायेत, हे का रांगेतून पुढे ढकलतायेत. पण, गेल्या 10 दिवसांपासून चैत्यभूमीवर या पोलीस नसलेल्या 2 हजार पोलिसांची फौज निस्वार्थपणे राबत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अनुयायांना शिस्तीत अन् शांततेत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सोडत आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापन केली होती. बहुजन समाजातील अधिकारी वर्गाच्या सुरक्षेसाठी बाबासाहेबांनी 24 ऑगस्ट 1924 साली समता सैनिक दलाची स्थापना केली होती. आज या समता सैनिक दलाच्या अध्यक्षा तथा कमांडर इन चीफ महउपासिका मीराताई आंबेडकर असून राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर आहेत. तर, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात हे दल कार्य करते. युवकांपासून ते सेवानिवृत्त झालेल्या वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील अनुयायी या समता सैनिक दलात कार्यरत आहेत.

समता सैनिक दलात सेवा देणाऱ्या उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील फुलचंद संभाजी जगताप यांच्याशी लोकमतने संवाद साधला. त्यावेळी, बीएसस्सी केमिस्ट्री ग्रॅज्युएट असलेल्या जगताप यांनी बाबासाहेबांवरील भक्ती अन् त्यांच्या शिकवणीचा पाढाच वाचायला सुरुवात केली. 2004 मध्ये आपलं गाव सोडून मुंबईला आलेले फुलचंद हे आज एका खासगी महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करतात. 150 रुपये घेऊन मुंबईत आलेल्या फुलचंद यांनी सुरुवातीला मासेमारीच्या व्यवसायातील कारखान्यात काम केल्यानंतर 2 वर्षांनी मुंबईतील बौद्ध धर्मांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा जवळून संबंध आला. सुरुवातीपासून वाचनाची आवड असल्याने, बाबासाहेबांच्या विचारांवर चालत असल्यामुळे लवकरच ते बौद्ध अनुयायांसमवेत रमले. आज भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या नवी मुंबईतील शाखेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या संघटनेत आम्हाला मान-सन्मान मिळतो. तसेच समाजबांधवांची सेवा करण्याची संधीही मिळते असे त्यांनी सांगितले. सोबतच, गतवर्षीच एक किस्साही त्यांनी आठवणीने सांगितला.

गतवर्षी महापरिनिर्वाणदिनी अचानक पाऊस आला होता. त्यावेळी, शिवाजी पार्कवर बौद्ध अनुयायांसाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळला. नगरपालिकेने मंडप टाकून दिला होता, पण मंडप पडल्यानंतर कुणीही तेथे आले नाही. त्यामुळे, रात्रीच्या 11 वाजता आम्ही सर्व समता दलाच्या सैनिकांनी ही जबाबदारी घेऊन पुन्हा मंडप उभारला. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भीम अनुयायांच्या झोपण्याची व्यवस्था झाली. बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आलेले अनेक अनुयायी आमच्यावर चिडतात, रागावतात, प्रसंगी भांडतातही पण आम्ही कधी रागात तर कधी प्रेमात त्यांनाच सेवा देतोय हे आम्हाला माहितीय. मिळेल ते खाऊन अन् भेटेल ती जागा पकडून झोपतो. आमचा गणवेशही आम्ही स्वखर्चानेच खेरदी करतो. समता सैनिक दलाचं विशेष प्रशिक्षणही घेतो. कारण, आम्हाला बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात दाखल झाल्याचा अन् संरक्षण सेवा दिल्याचा वेगळाच आनंद मिळतो. बाबासाहेबांचे सैनिक असल्याचं एक समाधान आम्हाला मिळतं, असे जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :दादर स्थानकमुंबईडॉ. बाबासाहेब आंबेडकरपोलिस