Join us

बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमानी कोकणकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या स्वागतासाठी बुधवारी चाकरमानी कोकणकडे रवाना झाले. चाकरमान्यांच्या सेवेसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या स्वागतासाठी बुधवारी चाकरमानी कोकणकडे रवाना झाले. चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने गणपती स्पेशल जादा गाड्या सोडल्या असून, या गाड्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी हिरवा झेंडा दाखवला.

गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या परिसरातील लाखोंच्या संख्येने चाकरमानी दरवर्षी कोकणात जातात. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या जादा गाड्यांना पसंती दिल्याने अवघ्या काही दिवसांत तब्बल २२११ गाड्या फूल झाल्या. त्यापैकी १०५८ गाड्यांना चाकरमान्यांनी ग्रुप बुकिंगला प्राधान्य दिले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना सुरुवात झाली असून, आज दादर, सेनापती बापट मार्ग येथून कोकणकडे रवाना होणाऱ्या जादा गाड्यांना अनिल परब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. परळ आगारातून बुधवारी सुमारे ११० हून अधिक गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

ठिकठिकाणी दुरुस्ती पथके तैनात

गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा वाहतुकीची सेवा निर्विघ्न पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत, तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षित-सुरळीत वाहतुकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत.

---

कोरोनाचे संकट लवकरच नष्ट होऊ दे

कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याने एसटीला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट लवकरच नष्ट होऊ दे, असे श्री गणरायाला साकडे घालत एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील व राज्यातील सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी पुन: एकदा उभारी घेईल, असा ठाम विश्वासही परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केला.

---