चाकरमानी निघाले गावाला; एसटी फुल; मुंबई, ठाणे, पालघरमधून सुटणार बस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 09:06 AM2024-03-21T09:06:12+5:302024-03-21T09:07:11+5:30
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून या सगळ्या एसटी बस सुटणार असून, सर्वाधिक बस कोकणात जाणाऱ्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून दिली.
मुंबई : होळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेप्रमाणे आता एसटी महामंडळाकडूनही जय्यत तयारी केली असून, राज्यभरात जाणाऱ्या सुमारे दीड हजारांहून अधिक नियमित एसटी बस हाउसफुल झाल्यात आहेत.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून या सगळ्या एसटी बस सुटणार असून, सर्वाधिक बस कोकणात जाणाऱ्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून दिली.
मुंबई महानगर प्रदेशातून दररोज राज्यभरात १ हजार ५०० हून अधिक एसटी बस सोडल्या जातात. पुढील तिन्ही दिवसांसाठी कोकणात जाणाऱ्या सगळ्या एसटी बस हाउसफुल झाल्या आहेत. यातील काही एसटी बसचे ग्रुप बुकिंग असून, उर्वरित एसटी बस आरक्षण झालेल्या आहेत.
‘या’ ठिकाणी जाण्यासाठी बुकिंग
कोकणाशिवाय कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी जाणाऱ्या नियमित एसटी बसेस हाउसफुल झाल्या आहेत.
मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरू नगर, बोरीवली नॅन्सी कॉलनी, खोपट, ठाणे या बसस्थानकांहून नियमित सुटणाऱ्या दीड हजार बसचे आरक्षण फुल झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.