मुंबई : भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप संपुष्टात आला नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळते. यातच 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील लेखक अरविंद जगताप यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
स्वत:च्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी दाखवू नका आणि पुन्हा कधीच महाराजांच्या नावाने मतं मागू नका, अशा शब्दांत अरविंद जगताप यांनी कुठल्याही राजकीय पक्षाचा उल्लेख न करता राज्यातील युती आणि आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. तसेच, स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे. नेता निवडीसाठी नाही, असे म्हणत अरविंद जगताप यांनी विधीमंडळ गटनेतेपदाची निवड करण्यावरूनही आपल्या लेखनीतून राज्यातील नेत्यांना टोला लगावला आहे.
'गुजरातचे त्याकाळचे सत्ताधारी लोक एक मराठी राजा येईल म्हणून घाबरायचे. त्या मराठी राजांचं नाव होतं शिवाजी महाराज. आता महाराष्ट्र कुणाची वाट पाहतो? कधी अहमद पटेल. कधी अमित शहा. आघाडी आणि यूतीत धमक नाही. स्वत:च्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी नका दाखवू. पुन्हा कधीच महाराजांच्या नावाने मत मागू नका. स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे. नेतानिवडीसाठी नाही', असे अरविंद जगताप यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
विशेष म्हणजे, अरविंद जगताप यांनी केलेली ही पोस्ट फेसबुकवर मोठ्याप्रमाणात शेअर होत आहेत. तसेच, अनेकांनी या पोस्टला लाईक केले असून प्रतिक्रियाही दिल्या आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. कारण, सत्तेतील समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.