मुंबई - झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या उपस्थितीत 'विजेता' चित्रपटासंदर्भात केलेल्या खास शोनंतर निलेश साबळे अडचणीत आले आहेत. चला हवा येऊ द्या च्या... टीमने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा अवमान केल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय. तसेच, याप्रकाराबद्दल निलेश साबळे यांनी जाहीरपणे माफी मागावी, असे आवाहनही संभाजीराजेंनी केले आहे.
'हवा येऊ द्या'मधील 'त्या' फोटोवर नेटकरी खवळले; शाहू महाराज, सयाजीरावांच्या अपमानाचा ठपका
चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी चित्रपटांचे प्रमोशन करण्यात येते. लोकप्रियतेमुळे हा विनोदी कार्यक्रम घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे ही नावे आता प्रत्येकाच्या परिचयाची झाली आहेत. त्यामुळे, जवळपास प्रत्येक एपिसोडला आवर्जुन पाहिलं जातं. बुधवार 11 मार्च 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर असणाऱ्या शाहूप्रेमींनी व्यक्त केली होती.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या..च्या त्या एपिसोडवर आक्षेप घेत, हा छत्रपती शाहू महाराजांचा अपमान असल्याचं नेटीझन्सने म्हटले होते. त्यानंतर, आता स्वत: छत्रपती शाहू महाराजांच्या गादीचे वंशच संभाजीराजे यांनी या कार्यक्रमातील त्या छायाचित्रावर आक्षेप घेतला आहे. तसेच, निलेश साबळे व झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराचा संभाजीराजेंनी दिला आहे.
चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील एका शोमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे नेटीझन्स, इतिहासप्रेमी आणि शाहू महाराजांना मानणारे अनुयायी संताप व्यक्त करत आहेत.