तळीरामांना कारवाईचा चाप
By admin | Published: January 2, 2015 12:35 AM2015-01-02T00:35:36+5:302015-01-02T00:35:36+5:30
नवीन वर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या ‘तळीराम’ चालकांवर यंदा मुंबई वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या ‘तळीराम’ चालकांवर यंदा मुंबई वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार अगोदरपासूनच जनजागृती हाती घेण्यात आली. त्यामुळे यंदा तळीराम चालकांची संख्या रोडावल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. या वेळी ५२३ चालकांवर कारवाई करण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक २१ ते ३0 वयोगटातील चालकांचा समावेश आहे. २0१३मध्ये नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्या ५७0 तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली होती.
नवीन वर्षाचे स्वागत करताना तळीराम चालकांचा बेभान आणि बेधुंदपणा नेहमीच दिसून येतो. त्यांच्या बेभानपणामुळे अपघातांनाही सामोरे जावे लागते. हे पाहता मुंबई वाहतूक पोलिसांनी तळीरामांना रोखण्यासाठी चांगलीच कंबर कसली. जादा वाहतूक पोलिसांची कुमक तैनात करताना पेट्रोलिंग करणाऱ्यांवर अधिक भर देण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे बार, परमिट रूम, हॉटेल यांतून बाहेर पडणाऱ्या तळीरामांना वाहन चालविण्यास परवानगी देऊ नये किंवा त्यांना सहायक चालक द्यावा यासाठी सर्व बार मालक, परमिट रूम चालकांनाही सूचना करण्यात आल्या होत्या. वाहतूक पोलिसांचा असलेला मोठा फौजफाटा आणि कठोर कारवाई करण्याचा दिलेला इशारा पाहता तळीरामांनी ३१ डिसेंबरच्या रात्री वाहन चालविण्याकडे पाठच फिरवल्याचे दिसून आले. वाहतूक पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून ते १ जानेवारीच्या सकाळी ६ वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली. या वेळी एकूण ५२३ तळीराम चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून, यामध्ये तब्बल ३७0 दुचाकीस्वार आहेत. तर उर्वरित १४३ कारचालक आणि ६ रिक्षाचालक असल्याचे सांगण्यात आले. दंड न भरल्यामुळे ४0७ गाड्या जमा करण्यात आल्या आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांमध्ये २१ ते ३0 वयोगटाचा सर्वांत जास्त समावेश होता. (प्रतिनिधी)
वयोगटानुसार कारवाईची माहिती
वयोगटकारवाई
१८ ते २0 १५
२१ ते २५१३७
२६ ते ३0१४९
३१ ते ३५१0६
३६ ते ४0७६
४१ ते ४५ १९
४६ ते ५0 १८
५१ ते ५८३
वाहतूक पोलिसांकडून कारवाई करताना १४८ विनापरवाना चालकही आढळले. यामध्ये सर्वाधिक डी.एन. नगरमध्ये १७, मालाडमध्ये १७, गोरेगाव आणि कांदिवलीमध्ये प्रत्येकी १४, बोरीवलीत १३, विक्रोळीत १0, चेंबूर आणि साकिनाकात प्रत्येकी ९ आणि मुलुंडमध्ये ८ चालकांचा समावेश आहे.
दारु पिऊन वाहन न चालविणाऱ्या चालकांनाही वाहतूक पोलिसांकडून शाब्बासकी देण्यात आली. या चालकांना वाहतूक पोलिसांनी गुलाब देऊन त्यांचे आभारही मानले आणि दारू पिऊन वाहन चालवू नका, असा संदेशही चालकांना देण्यात आला.
पश्चिम विभाग आघाडीवर
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांमध्ये पश्चिम विभाग सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून आले. मालाडमध्ये ५७, कांदिवलीत ३८, बोरीवलीत ३७, विमानतळ परिसरात ३७ आणि डी.एन. नगर परिसरात ३५ तळीराम चालक आढळले.