लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नव्या संसदेचे उद्घाटन होत असताना, आपल्या लोकशाही व्यवस्थेचा वारसा जपणे महत्त्वाचे आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी बुधवारी शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी पवार यांनी विविध राजकीय घडामोडींवर चर्चा केली. ‘लोकमत’चे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जन्मशताब्दी साजरी होत असून, त्याचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी डॉ. दर्डा यांनी ही भेट घेतली. याप्रसंगी डॉ. दर्डा यांनी त्यांचे ‘रिंगसाइड’ हे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तकही शरद पवार यांना सप्रेम भेट दिले.