अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देताना इच्छा असतानाही भाजपाला काही निष्ठावंतांना उमेदवारी देता आलेली नाही. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून ती दूर करण्याचे आव्हान भाजपाच्या नेत्यांपुढे आहे. त्या अनुषंगाने जिल्हाप्रमुख नरेंद्र पवार यांनी नाराज पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपाने अंबरनाथ नगरपरिषदेच्या ५७ जागांपैकी ४९ जागांवर उमेदवार दिले असून एका जागेवर भाजपाच्याच उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्याने पुरस्कृत करावे लागले आहे. शहरात भाजपा स्वबळावर ५० जागा लढवित असून या जागांचे वाटप करताना अनेकांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागले आहे. २५० हून अधिक इच्छूक उमेदवारीसाठी भाजपाच्या यादीत होते. त्यापैकी केवळ ५० जणांनाच उमेदवारी देता आल्याने असंख्य इच्छूक नाराज झाले आहेत. त्यात काही पक्षातील जुने पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील आहेत. उमेदवारी देताना ‘निवडून येण्याची क्षमता’ हाच मंत्र भाजपाने स्वीकारल्याने भाजपाला अनेक ठिकाणी आपल्या पदाधिकाऱ्यांना डावलून इतर उमेदवारांना उमेदवारी द्यावी लागली आहे. त्यामुळे अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपापुढे आव्हान निर्माण केले आहे. अशीच स्थिती अंबरनाथ मध्ये आहे. ८ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख नरेंद्र पवार हे स्वत: या प्रकरणात हस्तक्षेप करत आहेत.
नाराजी शमविण्याचे भाजपापुढे आव्हान
By admin | Published: April 06, 2015 5:28 AM