अवघ्या महिन्याभरात नाल्यांच्या सफाईचे आव्हान; मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 02:36 AM2020-05-03T02:36:28+5:302020-05-03T02:36:54+5:30
नदी, नाल्यांमधला गाळ काढण्याचे काम सुरू
मुंबई : मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू असल्याने पावसाळापूर्व कामे लांबणीवर पडली आहेत. याचा मोठा फटका नालेसफाईच्या कामाला बसला आहे. पावसाळ्याला अवघा महिना उरला असताना मुंबईतील नाले, नद्यांमधील गाळ काढण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण न झाल्यास मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२६ जुलै २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीने मुंबईला पुराचा तडखा दिला होता. या अनुभवानंतर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील नाल्यांचे तसेच नद्यांचे रुंदीकरण, नाल्यांमधील गाळ काढणे, आठ ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधणे, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवणे अशी कामे हाती घेण्यात आली. या प्रकल्पांमुळे मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र मुंबईचे अनेक भाग हे समुद्रसपाटीपासून खोलगट असल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात भरती आल्यास पाणी साचण्याचे प्रकार घडतात. याशिवाय प्लॅस्टिक कर्चऱ्यामुळेही पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण झाल्याने पाणी साचते.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होते. मात्र या वर्षी कोरोनारूपी संकट ओढवल्यामुळे मुंबईतील सर्व महत्त्वाची कामे ठप्प आहेत. संपूर्ण देशात १७ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. मात्र पावसाळापूर्व काम करणे आवश्यक असल्यामुळे २० एप्रिल रोजी महत्त्वाच्या कामांना यामधून वगळण्यात आले. त्यानुसार रस्तेदुरुस्ती, नालेसफाई अशी कामे सुरू झाली आहेत. अवघा महिना उरला असल्याने अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, मुख्य अभियंता (रस्ते) संजय दराडे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिनी) संजय जाधव यांनी शनिवारी या कामाचा आढावा घेतला.
पाणी साचणारी ३३६ ठिकाणे
सन २०१७ मध्ये मुंबईत २२५ ठिकाणी पाणी साचत होते. मात्र २०१८ मध्ये ४८ आणि २०१९ मध्ये ६३ ठिकाणाची यात भर पडल्याने एकूण पाणी साचणारी ठिकाणे ३३६ झाली होती.
पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे २२३ ठिकाणे पूरमुक्त झाली आहेत. तर आणखी २४ ठिकाणी सुरू असलेली काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू आहे.
१४ ठिकाणी पावसाळ्यातही काम सुरू राहणार आहे. तर २८ ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पालिका नियोजन करीत आहे. तर सात ठिकाणी काही बांधकामांमुळे काम सुरू झालेले नाही.