सोहराबुद्दीन प्रकरणाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 06:10 AM2019-04-19T06:10:00+5:302019-04-19T06:10:03+5:30
तुलसीराम प्रजापती कथित बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरात व राजस्थानच्या २१ पोलिसांसह फार्म हाउसच्या मालकाची निर्दोष सुटका केली.
मुंबई : सोहराबुद्दीन शेख, कौसरबी आणि तुलसीराम प्रजापती कथित बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरात व राजस्थानच्या २१ पोलिसांसह फार्म हाउसच्या मालकाची निर्दोष सुटका केली. सीबीआय न्यायालयाच्या या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
गेल्या वर्षी २१ डिसेंबर रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने एकूण २२ आरोपींविरुद्ध सबळ साक्षी-पुरावे उपलब्ध नाहीत, असे म्हणत त्यांची निर्दोष सुटका केली. त्यात २१ पोलीस व कौसरबी हिला ज्या फार्म हाउसमध्ये डांबून ठेवण्यात आले होते, त्या फार्म हाउसच्या मालकालाही यात आरोपी करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्याचीही निर्दोष सुटका केली.
२६ नोव्हेंबर २००५ रोजी गुजरात एटीएस व राजस्थानच्या पोलिसांनी हैदराबादहून सांगलीला परत येणाऱ्या सोहराबुद्दीन शेख याची गोळ्या झाडून हत्या केली. तर त्याच्या पत्नीला एका फार्म हाउसमध्ये डांबले व तिचीही हत्या केली. तसेच या घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीराम प्रजापती याची एका वर्षानंतर हत्या केल्याचा आरोप सीबीआयने आरोपींवर ठेवला होता. मात्र, सबळ पुरावे नसल्याने व एकापाठोपाठ जवळपास सर्वच साक्षीदार फितूर झाल्याने या सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. सीबीआयने गुजरात व राजस्थानच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या सुटकेला आव्हान देण्यास नकार दिल्याने अखेरीस सोहराबुद्दीनच्या भावाने उच्च न्यायालयात सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.