मुंबई : अमली पदार्थांचा देशद्रोहासाठी होणारा वापर, त्यासाठी युवकांचा होणारा वापर, पैशांच्या मोहामुळे त्यात अडकत जाणारी युवापिढी हे देशासमोरील आव्हान आहे, असे नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे निर्देशक समीर वानखेडे म्हणाले. शासन अमली पदार्थाच्या विरोधात असून भारतीय राज्यघटनेतील कलम ४७ अनुच्छेदनुसार औषधाखेरीज अमली पदार्थांचा वापर होणार नाही यासाठी कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
२६ जून, जागतिक अमली पदार्थ सेवनविरोधी दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, जिल्हाधिकारी मुंबई शहर, समाजकल्याण विभाग, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाउंडेशन, व्यसनमुक्तीवर कार्यरत असणाऱ्या संस्था संघटनांच्या अखिल भारतीय नशामुक्त अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ऑनलाइन वेबिनारचे आयोजन २६ जून रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत करण्यात आले होते. या वेळी समीर वानखेडे बोलत होते.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे चिटणीस अमोल मडामे व सलाम मुंबई फाउंडेशनचे असिस्टंट जनरल मॅनेजर दीपक पाटील म्हणाले, व्यसनाची सुरुवात साधारणपणे तंबाखूपासून होताना दिसते आणि नशेचे प्रमाण वाढविण्यासाठी दारू व त्यानंतर मंदधुंद होण्यासाठी अमली पदार्थाकडे आपसूकच पावले वळतात. अशा वेळी काही क्षणांसाठी केलेली नशा ही आयुष्यभराची सजा भोगायला लागते. कारण अमली पदार्थाचे सेवन केले नाही तर व्यक्ती स्वतःवरचे नियंत्रण सुटल्यामुळे कोणत्याही प्रकारची क्रिया करते. त्यामुळेच सामाजिक वातावरण खराब होऊन समाजाची हानी करतात. अशा वेळी पालक म्हणून मुलांसमवेत आपला नियमित संवाद साधणे, त्यांचा मित्र परिवार, भेटीगाठी यावर लक्ष ठेवून त्यांना अमली पदार्थाच्या दुष्परिणामांची माहिती देऊन दूर ठेवण्यासाठी आग्रही राहायला हवे. सामाजिक वातावरणात अमली पदार्थांना प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही, असे वातावरण निर्मिती करून प्रशासकीय यंत्रणेसमवेत अशा स्वरूपाचे प्रकार चालू असल्यास त्यावर बंदी आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा उभारून कार्यरत राहिले पाहिजे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अमली पदार्थांकडे तरुणाईच्या वाढत चाललेल्या वाटचालीबाबत चिंता व्यक्त केली. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रे अशा ठिकाणी अमली पदार्थावरील दुष्परिणाम व कायदे यांची माहिती देऊन जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मनोसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यसनी पेशंटवरील उपचार पद्धती, मानसिक आजार याबद्दल मार्गदर्शन केले.
अमली पदार्थाची माहिती प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाच्या संपर्क क्रमांकाच्या पोस्टर्सचे विमोचन या वेळी समीर वानखेडे, राजीव निवतकर यांच्या हस्ते करण्यात आले. अमली पदार्थ सेवनविरोधी दिनानिमित्त सामाजिक जाणीव संदेश म्हणून अक्षय कुमार, जॉन अब्राहम, शंकर महादेवन, माधुरी दीक्षित, सोनू सुद, क्रांती रेडकर, सूर्यकुमार यादव व व्यसनमुक्तीचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर सिद्धार्थ जाधव यांनी अमली पदार्थाच्या विरोधी लढ्यात आपला सहभाग म्हणून से नो टू ड्रग्ज म्हणत आपले मनोगत व्हिडीओजच्या माध्यमातून पाठवले होते. ते वेबिनारमध्ये दाखविण्यात आले.
वेबिनारचे संचालन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व सलाम मुंबई फाउंडेशनचे असिस्टंट जनरल मॅनेजर नारायण लाड यांनी केले. समाजकल्याणचे साहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी आभार व्यक्त केले.