कुर्ला परिसर समस्यामुक्त करण्याचे आव्हान

By admin | Published: November 10, 2015 02:20 AM2015-11-10T02:20:53+5:302015-11-10T02:20:53+5:30

गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या कुर्ला मतदारसंघावर यंदा मात्र सेनेने भगवा फडकवला. आमदार मंगेश कुडाळकर यांनी २००९ मध्येदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Challenge to free the Kurla area | कुर्ला परिसर समस्यामुक्त करण्याचे आव्हान

कुर्ला परिसर समस्यामुक्त करण्याचे आव्हान

Next

समीर कर्णुक, मुंबई
गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या कुर्ला मतदारसंघावर यंदा मात्र सेनेने भगवा फडकवला. आमदार मंगेश कुडाळकर यांनी २००९ मध्येदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र काही मतांच्या फरकाने त्यांना हार पत्करावी लागली होती. तेव्हा राष्ट्रवादीचे मिलिंद कांबळे विजयी ठरले होते. यंदा मात्र कार्यकर्त्यांच्या जोरावर कुडाळकर यांनी बाजी मारली. गेल्या वर्षभरापासून विविध विकासकामांमध्ये कुडाळकर व्यस्त आहेत. तथापि, कुर्ला हे समस्यांचे आगार बनले आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही.
कुर्ला परिसरातील बराचसा भाग झोपडपट्टीचा आहे. यात कुर्ला पश्चिम, तकिया वाडा, एल.बी.एस. मार्ग, पेस्तम सागर, टिळक नगर, सेल कॉलनी ठक्कर बाप्पा या परिसरांचा समावेश आहे. येथे पाणी, गटारे आणि रस्त्यांची समस्या सर्वांत जिकिरीची आहे. यात कुर्ल्यातील कुरेशी नगर या डोंगरावरील भागाला कुडाळकर यांनी दिलासा दिला आहे. अनेक वर्षांपासून पाण्याचा मोठा प्रश्न येथील रहिवाशांना भेडसावत होता. हा बराचसा भाग मुस्लीमबहुल असल्याने येथील मते शिवसेनेच्या पारड्यात येण्याची शक्यता पूर्वीपासूनच सेना कार्यकर्त्यांना नव्हती. तथापि, निवडणुकीपूर्वी आमदार कुडाळकर यांनी येथील रहिवाशांना निवडून आल्यानंतर पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वीच नव्याने पाइपलाइन टाकत प्रलंबित पाणीप्रश्न त्यांनी सोडवला आहे.
किशोरवयापासूनच मंगेश कुडाळकर शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यामुळे आजवर त्यांनी शिवसेना शाखाप्रमुख, गटप्रमुख, उपविभागप्रमुख अशा पदांवर काम केले आहे. कुर्ला मतदारसंघात वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी रस्त्यांची अवस्थाही वाईट आहे. त्यामुळे वाहनचालकांसह रहिवासीही त्रस्त असतात. येत्या दोन वर्षांत कुर्ल्यातील हा वाहतुकीचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा मानस कुडाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असल्याने येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत कुडाळकर महिन्यातून एकदा मीटिंग घेतात. यामध्ये गुन्हेगारी रोखण्यासंबंधी काय उपाययोजना करायला हव्यात, अशा विषयांवर संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजनदेखील ते करतात.

Web Title: Challenge to free the Kurla area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.