मुंबई : साडेतीन तास मध्य रेल्वे ठप्प करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे. सुमारे ८०० ते १००० रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मंगळवारी मध्य रेल्वेच्या दादर-माटुंगा स्थानका दरम्यान ‘रेल रोको’ केला होता. आंदोलनकांवर दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचा रेल्वे पोलीस प्रयत्न करत आहेत.रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मंगळवारी ‘रेल रोको’ केला होता. ‘रेल रोको’साठी केवळ मुंबई नव्हे, तर राज्यातील विविध भागांतील रेल्वे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. मुळात आंदोलन हे दादर-माटुंगा स्थानका दरम्यान झाले. तेथे सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत, तरीही आंदोलनकर्ते इतर स्थानकांवरून आले असतील, असे गृहीत धरून माटुंगा आणि दादर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे रेल्वे पोलीस मध्य परिमंडळाचे उपायुक्त समाधान पवार यांनी सांगितले.काही आंदोलनकर्ते रेल्वे कॉलनी येथील गेटमधून आले. मुळात स्थानकातून एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर तरुण रेल्वे रुळावर उतरणे शक्य नाही. आंदोलनाला राजकीय पार्श्वभूमी आहे का? या दिशेनेदेखील तपास सुरू करण्यात आला आहे.
‘रेल रोको’ आंदोलकांची ओळख पटविण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:41 AM