पुणे, नागपूर, नाशिकमधील संसर्ग नियंत्रणाचे आव्हान कठोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:08 AM2021-04-30T04:08:31+5:302021-04-30T04:08:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही, त्यात राज्यात उपचाराधीन रुग्णांमध्ये पुणे, नागपूर आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही, त्यात राज्यात उपचाराधीन रुग्णांमध्ये पुणे, नागपूर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. परिणामी, नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यातील लाॅकडाऊनचा कालावधी वाढविल्यास येथील परिस्थिती नियंत्रणात येईल.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २८ एप्रिलपर्यंत राज्यातील ६ लाख ७३ हजार ४८१ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यातील ६९ हजार ७०५ म्हणजेच १०.३३ टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर २२ हजार ३८७ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील ६ हजार २४८ रुग्णांना व्हेंटिलेटर आणि १६ हजार १३९ रुग्णांना ऑक्सिजन लावला आहे. राज्यातील एकूण परिस्थिती पाहता टास्क फोर्समधील तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, ११ मेपर्यंत पुण्यातील सक्रिय रुग्ण १ लाख २० हजार, नागपूर येथील सक्रिय रुग्ण १ लाख १३ हजार तर नाशिकमधील सक्रिय रुग्ण ९५ हजारांवर जाईल अशी माहिती आहे. परिणामी, या जिल्ह्यांत विलगीकरण खाटा, अतिदक्षता विभागातील खाटा, आक्सिजन-व्हेंटिलटेरचा अधिक तुटवडा भासेल, असा धोकाही तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
सध्या पुण्यात १ लाख ३९७, नागपूरमध्ये ७५ हजार ३४५ आणि नाशिकमध्ये ५२ हजार ६१० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सध्या राज्यात मुंबई, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मृत्युदर अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य आणि तांत्रिक सल्लागार सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, पुढील दोन ते तीन महिन्यांसाठी सामूहिक कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणातील वावर, बाजारपेठांमधील गर्दीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. सध्या डॉक्टर आणि अन्य आरोग्य सेवकांवर प्रचंड प्रमाणात ताण आहे, आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कठोर नियमांची मुदत वाढवावी.
* धोका अजून टळलेला नाही
राज्यासह मुंबईतील कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. अजूनही नियम शिथिल केल्यास पुन्हा प्रादुर्भाव वेगाने पसरताना दिसेल, त्यामुळे इतक्यात नियमांत शिथिलता आणून उपयोग नाही. राज्यातील १३-१४ जिल्ह्यांत बरे होण्याचा दर चांगला आहे. मात्र पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये अजूनही रुग्णसंख्येचा आलेख चढा आहे. लाॅकडाऊनच्या नियमांमुळे संसर्गाचे प्रमाण पसरण्याची गती कमी झाली आहे, संसर्ग संपलेला नाही.
– डॉ. शशांक जोशी, राज्य कोरोना टास्क फोर्स तज्ज्ञ
-------------------------