एमआयएमसमोर गड राखण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 01:34 AM2019-05-30T01:34:32+5:302019-05-30T01:34:53+5:30
दक्षिण मुंबईतील सर्वच मतदारसंघातून पीछेहाट होत असताना, भायखळा विधानसभा मतदार संघात काँग्रेसने आघाडी घेतली आहे.
- शेफाली परब-पंडित
दक्षिण मुंबईतील सर्वच मतदारसंघातून पीछेहाट होत असताना, भायखळा विधानसभा मतदार संघात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. येथे काँग्रेसच्या पारड्यात तब्बल २० हजार अधिक मतांची भर पडल्यामुळे मनसे फॅक्टर येथे प्रभावी ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी विधानसभेत आघाडीच्या उमेदवाराला येथून संधी आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत प्रथमच पुढे आलेला एमआयएम पक्ष, भाजपला समर्थन देणारी अखिल भारतीय सेनेचाही (अभासे) येथे जोर असल्याने येथील विधानसभा निवडणुकीत चुरशीची ठरणार आहे.
भायखळा विधानसभेत २०१४ मध्ये ५६.३० टक्के मतदान झाले होते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील मतदानाचा टक्का घसरला. यामध्ये भायखळा विधानसभा मतदारसंघात पावणेदोन टक्के कमी मतदान झाले. शिवसेना-भाजप युतीच्या मतांमध्ये सहा हजारांंची वाढ झाली, पण काँग्रेसला येथून सर्वाधिक मतदान झाल्याचे दिसून येते. गेल्या विधानसभेत एमआयएम पक्षाने येथून आपले खाते उघडले होते, परंतु या पक्षाचे सर्वेसर्वा ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या उमेदवाराने दक्षिण मुंबईत ३० हजार मते मिळविली आहेत.
या मतदारसंघातील लढत नेहमीच चुरशीची ठरली आहे. अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचा या मतदारसंघात प्रभाव होता. या पक्षाच्या दोन नगरसेविका येथून निवडून येत होत्या. मात्र, एमआयएम पक्षाचा जोर वाढताच अभासेने एक जागा गमावली, परंतु अभासेचा या परिसरात चांगला जोर असल्याने भाजपला याची दखल घ्यावी लागली. अभासेने २०१७ पालिका निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन पक्षानेही चांगली लीड घेतली आहे. मनसेने गेल्या विधानसभेत येथे जवळपास १४ हजार मते मिळविली होती. या मतांनी काँग्रेसचे हात लोकसभेत मजबूत केल्याचे चित्र आहे.
>विधानसभेवर काय परिणाम
मनसेने काँग्रेसला पाठिंबा दिला. काँग्रेसची मतं वाढविण्यासाठी प्रयत्न केला, पण त्याचा प्रभाव फारसा कुठे दिसून आला नाही. भायखळ्यात मात्र मनसेची मते काँग्रेसकडे वळल्याचे दिसून येते.
२००९ मध्ये काँग्रेसकडे असलेला भायखळा विधानसभा मतदारसंघ एमआयएमने काबीज केला. मात्र, हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्याची संधी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आहे.
या विधान सभेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू आहे. अभासे, भाजपच्या मदतीने हे स्वप्न साकार करण्याचे शिवसेनेचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, काँग्रेसच्या पारड्यात पडलेली अधिक मते युतीसाठी डोकेदुखीचे कारण ठरणार आहे.