पनवेल : उरण विधानसभा मतदारसंघात आमदार विवेक पाटील यांच्यासमोर कामगार नेते महेंद्र घरत यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. घरत आणि पाटील कामगार चळवळीशी संबंधित असल्याने दोन कामगार नेत्यांमध्ये कडवी झुंज असून महेंद्र घरत यांच्या पाठीमागे काँग्रेस आणि इंटकने पूर्ण ताकद उभी केली आहे. नवी मुंबई जनरल संघटनेचे हजारो कामगार आपल्या नेत्यांसह थेट रस्त्यावर उतरले आहेत.
शेतकरी कामगार पक्षातून राजकारणाला सुरुवात केलेल्या घरत यांनी लालबावटा व विशेषत: आमदार विवेक पाटील यांचे राजकारण अगदी जवळून पाहिले आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांची क्षमता, ताकद आणि निवडणूक रणनीती घरत यांना ठाऊक आहे. त्याचा आढावा घेवून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून शेतकरी कामगार पक्ष हाच आपला मूळ प्रतिस्पर्धी असल्याचे काँग्रेसचे उमेदवार घरत यांनी सांगितले. रामशेठ ठाकूर यांचा उजवा हात असलेल्या या कार्यकत्र्याने काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला. राज्यात इंटक संघटना वाढविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे 2क्क्9 साली इंटकने त्यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. मात्र शाम म्हात्रे यांच्यासाठी त्यांनी हा हट्ट सोडून दिला. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, रायगड जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे आर. सी. घरत यांना उमेदवारी मिळावी याकरिता पक्षाकडे आग्रह धरला त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत पक्षाने महेंद्र यांना उरणमधून तिकीट दिले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याशिवाय हे पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहे. नवी मुंबई जनरल कामगार संघटनेच्या महेंद्र घरत यांनी लाखो कामगारांना एकत्रित करून संघटना वाढवली. त्याचबरोबर इंटक या संघटनेशी निगडित असल्याने त्यांचे नाव थेट दिल्लीर्पयत पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही कामगारांची बाजू मांडण्याचे काम त्यांनी केले असल्याने कामगार क्षेत्रत दबदबा आहे.
जिल्हय़ात उरण मतदारसंघ प्रतिष्ठेचा असून याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणो व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे लक्ष आहे. आमदार विवेक पाटील सुद्धा कामगार संघटनेशी निगडित असून त्यांची स्वत:ची संघटना आहे. मागील निवडणुकीत कामगार नेते शाम म्हात्रे यांचे त्यांच्यासमोर आव्हान होते. मात्र यावेळी म्हात्रे रिंगणात नसून त्यांच्याऐवजी महेंद्र घरत यांना तिकीट देण्यात आले आहे. पनवेल तालुक्यातील ओवळे व गुळसुंदे हा विभाग उरण विधानसभा मतदारसंघात असून या ठिकाणी काँग्रेसची ताकद चांगली आहे.