Join us

धार्मिक सलोखा राखण्याचे आव्हान

By admin | Published: November 11, 2015 12:58 AM

मुंबई शहरातील सर्वाधिक काळ चालणारे गणेश विसर्जन गिरगाव चौपाटी येथे होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत येथे लाखो गणेशभक्तांची ये-जा सुरू असते.

समीर कर्णुक, मुंबईमुंबई शहरातील सर्वाधिक काळ चालणारे गणेश विसर्जन गिरगाव चौपाटी येथे होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत येथे लाखो गणेशभक्तांची ये-जा सुरू असते. ही गर्दी सावरण्यापासून वाहतूककोंडी आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा देण्याचे काम झोन २ मधील पोलिसांना डोळ्यात तेल घालून करावे लागते. झोन २ मधील बराचसा भाग हा व्हीव्हीआयपी असल्याने याचीदेखील मोठी जबाबदारी या झोनवर आहे. या झोनअंतर्गत भुलेश्वर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा, मुंबादेवी मंदिर ही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. तसेच राजभवन हा महत्त्वाचा परिसर आहे. झवेरी बाजारसारखी मोठी बाजारपेठ या झोनमध्ये असल्याने सुरक्षेची मोठी जबाबदारी या झोनवर आहे. या झोनमध्ये कॉस्मोपोलिटन वस्ती सर्वाधिक आहे. त्यामुळे बकरी ईद असो अथवा गणेशोत्सव, सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. तेव्हा धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. तेव्हा पोलीस खात्याची खरी परीक्षा असते. त्यामुळे धार्मिक सण-उत्सवांच्या काळात झोन-२ च्या कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो. पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक हेदेखील मोठ्या सणांवेळी स्वत: घटनास्थळी हजर राहून सुरक्षेचा आढावा घेतात. बकरी ईदनंतर बंगाली समुदायाचा विश्वकर्मा सण, रमाजान ईद, गणेश उत्सवाचे दहा दिवस त्यानंतर नवरात्रीदेखील या भागात मोठ्या प्रमाणात साजरी होते. शिवाय मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला, सह्याद्री गेस्ट हाऊस आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासारखे अनेक मोठमोठ्या उद्योगपतींचे बंगले या झोनमध्ये आहेत. त्यामुळे नेहमीच सुरक्षेची मोठी जबाबदारी या झोनमधील पोलिसांवर असते. या झोनमध्ये झवेरी बाजार ही सोने आणि हिऱ्यांची मोठी बाजारपेठ आहे. येथे अनेकदा फसवणुकीचे प्रकार होतात, तेव्हा त्यावर त्वरेने कारवाई होणे आवश्यक असते. शिवाय अनेक खासगी कंपन्यांची कार्यालये या झोनमध्ये आहेत. त्यामुळे फसवणुकीचे गुन्हे या झोनमध्ये अधिक नोंदवले गेले आहेत. सोनसाखळी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांमध्येदेखील मागच्या वर्षाच्या तुलनेत या झोनमध्ये वाढ झालेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या झोनमध्ये सोनसाखळी चोरी आणि घरफोडींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांनी ज्या परिसरात जास्त घटना होतात अशा ठिकाणी रात्रीची गस्त वाढवली आहे. शिवाय सोनसाखळीचे गुन्हे रोखण्यासाठीदेखील ठरावीक ठिकाणी पोलिसांचा पहारा कडक केला आहे.