छोट्यांच्या खिशाला परवडणारे पौष्टिक पदार्थ बनविणे हे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 03:23 AM2019-06-03T03:23:28+5:302019-06-03T03:23:33+5:30
राजेंद्र प्रधान : एफडीएची मार्गदर्शक तत्त्वे स्तुत्य; मात्र अंमलबजावणी कठीण
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांमधील स्थूलपणा आणि जीवनशैलीशी निगडित आजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील २,२०० शाळांना मार्गदर्शक तत्त्वे पाठविली आहेत. त्यानुसार, मुलांना फास्टफूडसह मैदा, मीठ आणि तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात न देता, त्यांना पौष्टिक आहार देणे शाळांमधील उपहारगृहांना बंधनकारक करण्यात येणार आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश अत्यंत स्तुत्य असला, तरी त्यांची अंमलबजावणी करणे वाटते तितकी सोपी नाही, असे मत सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले आहे.
शाळेच्या उपहारगृहांमध्ये मुलांना पोषक-पौष्टिक खाद्यपदार्थ मिळायला हवेत, याबाबत सर्वांची सहमती आहे, पण हे खाद्यपदार्थ मुलांच्या खिशाला परवडणारे असायला हवेत. त्यामुळे पौष्टिक खाद्यपदार्थ किंमत वाढू न देता, ते विद्यार्थ्यांना स्वस्तात उपलब्ध करून देणे हेच खरे आव्हान असल्याची प्रतिक्रिया प्रधान यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, आता शाळांनी एफडीएच्या या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी शेफची नेमणूक करण्याचे ठरविले आहे. ते मुलांच्या आहारातील पौष्टिकतेची काळजी घेतील, असे मत शाळांचे मुख्याध्यापक व्यक्त करत आहेत. डी. एस. हायस्कूलने सेलिब्रिटी शेफ यशोधन देशमुख यांची निवड केली आहे. मुलांच्या जिभेची आणि खिशाचीही काळजी घेतील, असे खाद्यपदार्थ शेफ यशोधन देशमुख सुचविणार असून, त्यानुसार नवीन शैक्षणिक वर्षापासून उपहारगृहामधल्या मेन्यूमध्ये योग्य ते बदल करण्यात येतील, अशी माहिती प्रधान यांनी दिली.
शाळेच्या उपहागृहामध्ये मुले पालक-शेपू-मेथीसारख्या हिरव्या भाज्या खातील, ही अपेक्षा अवास्तव आहे. मुलांना वडापाव, समोसा, मंच्युरियन, बर्गर हे चटपटीत पदार्थ आवडतात. या चटपटीत पदार्थांनाच कसे पौष्टिक बनविता येईल, त्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कशी वाढविता येईल, याबाबत खरेतर प्राधान्याने विचार व्हायला हवा. - शेफ यशोधन देशमुख