Join us

महिला उमेदवार शोधणे हेच राजकीय पक्षांसमोर आव्हान

By admin | Published: April 05, 2015 10:38 PM

विरार पूर्वेस मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेला प्रभाग क्र. ६ चे क्षेत्रफळ कमी असले तरी लोकसंख्या मात्र १० हजारांच्या घरात आहे.

दीपक मोहिते, वसईविरार पूर्वेस मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेला प्रभाग क्र. ६ चे क्षेत्रफळ कमी असले तरी लोकसंख्या मात्र १० हजारांच्या घरात आहे. घाणीचा तलाव, भालचंद्रनंगर, कातकरी पाडा, गास पाडा इ. परीसराचा त्यामध्ये समावेश आहे. हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाला आहे. महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी या परीसराच्या विकासाची जबाबदारी तत्कालीन चंदनसार ग्रामपंचायतीकडे होती. गेल्या ५ वर्षांत रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण इ विकासकामे झालीत. पण अन्य विकासकामाकडे मात्र पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. अनेक पाड्यांवर अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली. परंतु त्यावर कारवाई करण्याचे मनपा प्रशासनाने जाणीवपूर्वक टाळले. महानगरपालिकेत असूनही विकासाला चालना नाही, अशी सध्या स्थिती आहे.प्रभाग क्र. ७ हा देखील सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे. अ.जा. व अनु. ज. समाजाची लोकसंख्या केवळ १२०० च्या घरात आहे. त्यामुळेच हा प्रभाग सर्वसाधारण म्हणून आरक्षित झाला आहे. जीवदानी डोंगरचा पायथा, पायपायरी, वैष्णवीनगर व कातकरी पाड्याचा काही भाग याचा प्रभागामध्ये समावेश आहे. या प्रभागातही आता अनधिकृत बांधकामांना वेग आला आहे. पूर्वी अनधिकृत चाळींचे काम होत असे, आता चाळीच्या ठिकाणी टोलेजंग अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत. वन, आदीवासी व सरकारी जमिनीवरही अतिक्रमणे झाली आहेत. कोट्यवधी रुपयांच्या जमिनी भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. परंतु कारवाई मात्र शून्य. प्रभाग क्र. ८ हा विरार शहरात असून येथील लोकसंख्येत वाढ झाली आहे. अनधिकृत बांधकामे, लोडबेअरींग इमारतीचे पीक या प्रभागात पहावयास मिळते अशा इमारतीमध्ये ५ ते ६ लाखात खोल्या मिळत असल्यामुळे बाहेरील नागरिकांचा ओघ वाढत गेला. त्यामुळे पाणी, आरोग्य इ समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या. हा प्रभागही सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असून या प्रभागात १० हजार मतदार आहेत. बेगर्स होम, सहकारनगर व जीवदानी रस्त्यालगतचा भाग इ. परीसर या प्रभागात समावेश आहे.अशा परिस्थिती मध्ये येत्या मे महिन्यामध्ये मनपाची दुसरी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. आरक्षण व प्रभाग रचनामुळे धास्तावलेले राजकीय पक्ष आता सावरले असून आरक्षणानुसार उमेदवार शोधण्याच्या कामांना मोठे प्राधान्य देण्यात येत आहे. विशेष करून महिला उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षासमोर आहे. हे आव्हान ते कसे पेलतात यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.