संदीप जाधव, महाडमहाड व पोलादपूर तालुक्यात सध्या डोंगर व माळरानांना लावण्यात येत असलेल्या वणव्यांमुळे वनविभाग हतबल झाले आहेत. वारंवार लागणारे वणवे प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. गावोगाव रात्रंदिवस लावले जाणारे वणवे रोखण्याचे प्रशासनापुढे एक मोठे आव्हान ठरत आहे. वणव्यामुळे वनसंपदा तसेच वन्यजीवांचा ऱ्हास होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी असून यासाठी वणवाविरोधी अभियान राबवून जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.नोव्हेंबर अखेरपासून ते अगदी मे महिन्यांपर्यंत कोकणात वणवे लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे. दिवसेंदिवस वणवे लावण्याच्या या प्रवृत्तीत वाढच होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढसळत आहे. पावसाळ्यात वाढलेले माळरानावरील गवत वनस्पती तसेच डोंगरांवरील वनसंपदा या वणव्यात पूर्णपणे भस्मसात होत असल्याचे पहायला मिळत आहे. एखाद्या व्यक्तीने बेतालपणे लावलेल्या वणव्याची झळ अमर्यादपणे पसरुन त्यात शेकडो एकर जमिनीवरील वनसंपत्ती नष्ट होवून ही माळराने व डोंगरे अक्षरश: ओसाड पडत आहेत. या वणव्यात वनसंपदेसह असंख्य वन्यजीव, जनावरे देखील नष्ट होत असून त्याचा परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याने पर्यावरणपे्रमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.दोन वर्षापूर्वी गावोगाव सुरु लागणारे हे वणवे रोखण्यासाठी तत्कालीन प्रांताधिकारी रवींद्र हजारे आणि वनक्षेत्रात देशमुख यांनी विशेष मोहीम राबवून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली होती. त्यावेळी त्यांच्या या प्रयत्नांना यश आले होते. मात्र वणव्यावर रोख लावण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. मागील आठवड्यात महाड औद्योगिक वसाहत परिसरात लावलेल्या वणव्यात शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर दोन दिवसांपूर्वी कांबळेतर्फे महाड या गावात लागलेल्या वणव्यात बोंद्रे यांची आंब्याची कलमे जळून खाक झाली होती. त्यात शेतकरी महिलेचे पन्नास हजार रु.ची हानी झाली होती.
वणवे रोखण्याचे आव्हान !
By admin | Published: December 05, 2014 12:20 AM