मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपा एकत्र येत आगामी महापालिका निवडणुका लढणार असल्याचं माहिती समोर आली आहे. त्याची सुरुवात औरंगाबाद महापालिकेपासून होईल. त्याचसोबत मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकांमध्येही शिंदे गट आणि भाजपा एकत्रपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सामना करणार आहेत. याचा थेट फटका उद्धव ठाकरेंना बसण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. परंतु यंदा शिवसेनेसमोरील आव्हान कडवं आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे आमदार यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, दिलीप लांडे हे ५ आमदार तर राहुल शेवाळे हे खासदार आहेत. तर माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अद्याप मुंबईतील शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले नाही. परंतु भविष्यात काही नगरसेवक पाठिंबा देऊ शकतात असं बोललं जात आहे. त्यामुळे मुंबईचा गड राखण्यासाठी शिवसेनेला कसरत करावी लागणार आहे.
खरी शिवसेना कुणाची?शिवसेना आमचीच आहे त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावं असं पत्र शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिले आहे. याबाबत ८ ऑगस्टपर्यंत ठाकरे-शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवसेनेत बहुमत मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. त्यासाठी शिंदे ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. गुरुवारी लिलाधर डाके, मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जात मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.
उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणाशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. तसेच ज्यांना मोठे केले ते निघून गेलेत. आता सामान्य लोकांना अतिसामान्य करायचे आहे, त्यांची नसलेल्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे, पण आपल्याला असलेल्या शिवसेनेची पुनर्बांधणी करायची आहे, असे आवाहनही शिवसेना कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच उपरवाले के घर देर है अंधेर नहीं, असे म्हणत शिंदे गटाला इशाराही दिला आहे.