लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत मागील पंधरवड्यापासून सातत्याने लसींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, रोज ३० हून अधिक लसीकरण केंद्रे बंद होत आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नव्याने येणारा लसींचा साठा केवळ पालिकेच्या लसीकरण केंद्रांना पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता १ मेपासून सुरू होणाऱ्या १८ वर्षांवरील व्यक्तींचा लसीकरण कार्यक्रम हाती घेत असतानाच पालिकेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
राज्यासह मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यानंतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या सर्व व्यक्तींना लसीकरण खुले कऱण्यात आले. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढण्याच्या टप्प्यात लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून आले, परंतु, त्यानंतर सातत्याने लसीच्या साठ्यात तुटवडा जाणवल्याने या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.
१ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या टप्प्यासाठी मुंबईत १८ ते ४५ वयोगटांतील ४० लाख लाभार्थी आहेत. राज्य शासनाने रविवारी या लाभार्थ्यांचे मोफत लसीकरण करण्याचा सकारात्मक निर्णयही घेतला, मात्र असे असले तरीही लसीच्या पुरवठ्याविषयी आणि लसीकरण केंद्राच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
* काेव्हॅक्सिनचा साठाही दाेन दिवसांत येणार!
पालिका आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, मुंबईत सद्यस्थितीत ५९ सार्वजनिक तर ७३ खासगी लसीकरण केंद्रे आहेत; मात्र कोविड प्रतिबंध लसींचा साठा मर्यादित स्वरुपात असल्यामुळे काही ठराविक केंद्रांवर लस दिली जात आहे. पालिकेकडे कोविशिल्ड लसीचा नवीन साठा आला आहे, दोन दिवसांत कोव्हॅक्सिन लसींचा साठाही येणार आहे. लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या डोसचे लाभार्थी आणि प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लस देण्यात येईल. त्याचप्रमाणे, नव्याने सुरू होत असलेल्या लसीकरण टप्प्यासाठी वस्त्यांमध्ये लसीकरणाचा प्रस्ताव आहे. तसेच, लसीकरण केंद्राची संख्याही वाढविण्यात येणार आहे.
* आतापर्यंत झालेले लसीकऱण
आरोग्य कर्मचारी - २ लाख ७४ हजार ६१८
फ्रंटलाईन कर्मचारी - ३ लाख १३ हजार ७८५
४५ ते ५९ वयोगटातील व्यक्ती - ७ लाख ६४ हजार ७८
६० हून अधिक वयोगटातील व्यक्ती - ८ लाख ६१ हजार ३८३
एकूण लसीकरण - २२ लाख १३ हजार ८६४
-------------------------