रिपब्लिकन नेत्यांसमोर स्वबळावर जिंकण्याचे आव्हान - आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:19 AM2019-04-15T06:19:06+5:302019-04-15T06:19:20+5:30
स्वबळावर निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान रिपब्लिकन चळवळीसमोर आहे.
मुंबई : स्वबळावर निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान रिपब्लिकन चळवळीसमोर आहे. विविध गटातटांत विभागल्यामुळे दलित नेत्यांची राजकीय शक्ती विभागली गेली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील राजकीय संघटन उभारण्यासाठी सर्व गटांनी एकत्र यायला हवे. रिपब्लिकन एकत्रीकरण होणार असेल तर दुय्यम स्थान स्वीकारायला तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती दिनानिमित्त आठवले यांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट देत बाबासाहेबांना अभिवादन केले. रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर नेतृत्वाच्या वादात मी पडणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी त्याचे नेतृत्व करावे.
प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र आलो तर रिपब्लिकन ऐक्याची ताकद वाढेल. राजकीयदृष्ट्या समाजाचे महत्त्व वाढेल. या ऐक्यासाठी मंत्रीपद सोडायचीही माझी तयारी आहे. मात्र, माझे मंत्रीपद घालविण्यापेक्षा मंत्रीपदाची संख्या वाढविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे, असे आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए ) सोबत आहे. एनडीएत असलो तरी महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राज्यात भाजपसोबत आमची युती नाही.
शिवाय, नोंदणीकृत पक्ष असल्याने काही जागांवर निवडणुका लढणे आवश्यक आहे. त्यामुळे देशभर १३ राज्यांत रिपाइंचे उमेदवार आहेत. एकूण ७६ जागांवर रिपाइं उमेदवार असून उर्वरित ठिकाणी आमचा एनडीएला पाठिंबा असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
>‘राज ठाकरेंच्या भाषणाचा परिणाम नाही’
राज ठाकरेंच्या भाषणातील गर्दी मतात परिवर्तित होणार नाही. ते वक्ते आहेत, भाषण, इव्हेंट करण्यासाठी त्यांचे चांगले प्रशिक्षण झाले आहे. मात्र, त्यांच्या या भाषणांचा फारसा राजकीय परिणाम होणार नाही, असेही आठवले म्हणाले.