मुंबई : वैमानिक होऊन विमानाचे सारथ्य करण्याचे गुलाबी स्वप्न पाहात मोठी आर्थिक गुंतवणूक करून, वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींना सध्या या क्षेत्रातील विविध आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. भारतीय हवाई वाहतूक कंपन्यांसमोरील आव्हानांमध्ये वाढ होत असल्याने, वैमानिकांवरील कामाच्या ताणातदेखील मोठी वाढ झाली आहे. त्यातच वेळेवर पगार मिळत नसल्याची खंतही अनेक वैमानिकांकडून व्यक्त होत आहे.
कामाचे अतिरिक्त तास, आठवड्यात हक्काची सुट्टी नाही, पुरेशी विश्रांती न घेता सलग कामावर हजर राहणे, अशा विविध समस्यांना या वैमानिकांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, इंडिगोमधील वैमानिकांच्या कमतरतेमुळे त्यांना रोज ३० विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. एअर इंडिया व जेटच्या वैमानिकांना पगार वेळेवर मिळत नसल्याने त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. वाढता खर्च कमी करण्यासाठी विमान कंपन्यांनी क्रु आॅप्टिमायझरचे साहाय्य घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे कंपनीला आर्थिक लाभ होत असला, तरी वैमानिकांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. वैमानिकांना त्यांच्या शहरातून विमानाचे उड्डाण करता येईल व कुटुंबासह पुरेसा वेळ घालविता येईल, अशी व्यवस्था विमान कंपन्या करतात. मात्र, आर्थिक लाभासाठी कंपन्यांकडून देशातील कुठल्याही शहरात हॉटेलमध्ये थांबायला लावून तिथून दुसऱ्या उड्डाणास जाण्यास सांगितले जाते, असा नाराजीचा सूर वैमानिकांत आहे.गांभीर्याने लक्ष देणे गरजेचेकाही देशांमध्ये घरातून निघाल्यापासून ड्युटी तास मोजले जातात. मात्र, भारतात विमानतळावर रिपोर्टिंग केल्यापासूनचा कालावधी मोजला जातो. वैमानिकांच्या वाढत्या ताणाकडे देशातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन गांभीर्याने ही समस्या सोडविण्याची मागणी वैमानिकांमधून करण्यात येत आहे.