घरफोड्यांना आवर घालण्याचे आव्हान
By admin | Published: January 6, 2016 01:17 AM2016-01-06T01:17:25+5:302016-01-06T01:17:25+5:30
मुलुंड ते घाटकोपर या विभागात घरफोड्यांच्या गुन्ह्यांना आळा घालणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या
मनीषा म्हात्रे, मुंबई
मुलुंड ते घाटकोपर या विभागात घरफोड्यांच्या गुन्ह्यांना आळा घालणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या मुंबईच्या या मुख्य तीन प्रवेशद्वारांमार्गे गुन्हेगारांना पळ काढणे सहज शक्य होते. त्यावर उपाय म्हणून पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी पदभार स्वीकारल्यापासून याच प्रवेशद्वारांवर नाकाबंदी वाढविली. त्यामुळे सोनसाखळीपाठोपाठ घरफोडीच्या गुन्ह्यांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यास मदत झाली. मात्र घरफोड्यांच्या गुन्ह्यांवर पूर्णत: नियंत्रण आणण्यास यश आलेले नाही.
पूर्व उपनगरातील मिल, छोटे कारखान्यांसारखे औद्योगिक कारखाने बंद पडल्यानंतर या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या. वाढत्या इमारतींमुळे लोकसंख्येतही भर पडत आहे. मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेले मुलुंड चेकनाका, आनंद नगर टोलनाका आणि ऐरोली टोलनाका हे परिमंडळ ७ अंतर्गत मुंबईला जोडले आहे. त्यामुळे मुंबईतून हद्दपार केलेले गुन्हेगार बहुतांश वेळी या मार्गाचा वापर करतात. तर गणेशोत्सव, नवरात्रौत्सव या सणांदरम्यानही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात ठाणे, रायगड परिसरातून मंत्रालयाकडे जाणारे मोर्चेही याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे ती परिस्थिती नियंत्रणात ठेवताना पोलिसांच्या नाकीनऊ येतात. आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत विक्रोळी पूर्व परिसरात आहे. साहित्यिक, कलाकार मंडळी या ठिकाणी राहण्यास असल्याने सायलेन्स गुन्हे या ठिकाणी होताना दिसतात. कुमार पिल्ले गँगपासून विभक्त झालेल्या गँगस्टरची या उपनगरात दहशत आहे. यामध्ये अनिल पांडे, संतोष चव्हाण ऊर्फ संत्या कान्या यांची हत्या करण्यात आल्यानंतर सद्य:स्थितीत गँगस्टर मयूर शिंदे, अमित भोगले कार्यरत आहेत. मिनी पाकिस्तान म्हणून ओळख असलेला भांंडुपमधील सोनापूर परिसरही या परिमंडळात असल्याने पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागत आहे.
२०१३ मध्ये झोन ७ मध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांनी जोर धरला होता. दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरांना हे तीनही टोलनाके मुंबईबाहेर पळ काढण्यास महत्त्वाचे ठरत होते. १४ आॅगस्ट २०१४ रोजी विनयकुमार राठोड यांनी पोलीस उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारताच सोनसाखळी चोरांना टार्गेट केले. टोलनाक्यांवरील नाकाबंदीबरोबरच पूर्व द्रुतगती आणि एलबीएस मार्गावरील बंदोबस्तात भर घातल्याने सोनसाखळी चोरांना काही प्रमाणात चाप बसला असून आणखी प्रतिबंधक योजना हाती घेण्यात आल्या आहेत.