उच्चभ्रूंना मतदानासाठी उतरविण्याचे आव्हान; भाजपही अजमावणार ताकद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:39 AM2019-03-30T00:39:04+5:302019-03-30T00:40:42+5:30
पवईच्या उच्चभ्रू वस्तीसह चांदिवलीमधील चाळीतील नागरिकांच्या वस्तीचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १ लाख ७२ हजार ८७५ जणांनी मतदान केले होते.
- खलील गिरकर
उत्तर मध्य मुंबई
पवईच्या उच्चभ्रू वस्तीसह चांदिवलीमधील चाळीतील नागरिकांच्या वस्तीचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १ लाख ७२ हजार ८७५ जणांनी मतदान केले होते. या वेळी २ लाख ८ हजार ८३३ पुरुष मतदार, १ लाख ५२ हजार ८९९ महिला मतदार व १ तृतीयपंथी मतदारासह एकूण ३ लाख ६१ हजार ७३३ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी किती मतदार प्रत्यक्षात मतदानाला उतरतात हे पाहावे लागेल.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना ६३ हजार १६० मते मिळाली होती, तर भाजपच्या पूनम महाजन यांना ९६ हजार ८३ मते मिळाली होती. चांदिवली मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान करीत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसची संघटनात्मक ताकद चांगली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या चांदिवली मतदारसंघातून नसीम खान हे २००९ व २०१४ मध्ये विजयी झाले होते. त्यापूर्वी त्यांनी कुर्ला मतदारसंघातून विजय मिळविला होता. अल्पसंख्याक समाजाचे प्रमाण लक्षणीय असलेल्या चांदिवली मतदारसंघातून निवडून आलेल्या खान यांना काँग्रेस सरकारच्या काळात राज्यमंत्रीपद व कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. खान यांनी या मंत्रीपदाचा वापर करत मतदारसंघात आपली पाळेमुळे चांगल्या प्रकारे रोवली आहेत.
दुसरीकडे, पूनम महाजन यांनीदेखील या मतदारसंघावर विशेष लक्ष दिल्याचा दावा नगरसेवक हरीश भांदिर्गे यांनी केला आहे. गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळविण्याचा विश्वास भाजपतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. या मतदारसंघात काँग्रेसने प्रचंड काम केलेले असल्याने या मतदारसंघातून या वेळी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना मताधिक्य मिळेल, असा दावा नसीम खान यांनी व्यक्त केला आहे. मनसेला २००९ ला विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ४८ हजार ९०१ मते मिळाली होती; तेव्हाचे त्यांचे उमेदवार असलेले दिलीप लांडे सध्या शिवसेनेत आहेत. २०१४ मध्येदेखील मनसेला ईश्वर तायडेंच्या माध्यमातून २८ हजार ६७८ मते मिळाली होती. हे दोन्ही नगरसेवक सध्या शिवसेनेत आहेत. मनसेचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने मनसेला मानणारे मतदार नेमके कोणत्या बाजूला झुकतात हे पाहणे रंजक ठरेल.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ चांदिवली मतदारसंघात काँग्रेसचा आमदार निवडून आला असला तरी गेल्या निवडणुकीत पूनम महाजन यांना मिळालेल्या मताधिक्यामध्ये विलेपार्लेनंतर द्वितीय क्रमांकावर चांदिवली मतदारसंघातून ३२ हजार ९३३ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. खान यांनी सत्तेत असताना कामे केली असली तरी आता सत्ता नसल्याने त्यांच्या कामावर मर्यादा आल्या असून भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. त्याचा लाभ भाजपच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय घडामोडी
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना उत्तर मध्य मुंबईतील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी चांदिवली, विलेपार्ले, वांद्रे पश्चिम व कलिना या चार मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार होते. तर कुर्ला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होता. वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचा आमदार होता.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसकडे केवळ चांदिवली मतदारसंघ आहे तर विलेपार्ले, वांद्रे पश्चिम हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. वांद्रे पूर्वसहित कुर्ला मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.
राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्याचा राजकीय लाभ भाजप उमेदवार पूनम महाजन यांना मिळण्याची शक्यता आहे.