Join us

चलो अयोध्या ! रामलल्लाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तारीख ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 5:02 PM

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नव्हता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता.

मुंबई -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचा 24 नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला हा अयोध्या दौरा लांबणीवर प़डला होता. आता, शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार असून प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नव्हता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय उलथापालथ घडल्याचे दिसून आलं. त्यामुळे राज्यात नवे सरकार स्थापन होण्यास विलंब झाला. या निव़़डणुकीत भाजपा आणि शिवसेना महाय़ुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्याने शिवसेनेने भाजपाची साथ सोडली होती. त्यानंतर, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. पण, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, हे सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा, असे म्हटले. तसेच, सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील, असेही राऊत यांनी जाहीर केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राऊत यांनी याबाबत माहिती दिली. 

दरम्यान, गतवर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. दरम्यान अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. हा दौरा 24 नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मात्र. राज्यात सत्तास्थापनेस विलंब होत असल्याने हा दौरा लांबणीवर पडला होता.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाअयोध्यासंजय राऊत