मुंबई - राज्याच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी मोठं सत्तानाट्य पाहायला मिळालं. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह काही आमदार रातोरात सूरतला गेले. त्यानंतर शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतला आणि शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांची त्यांना साथ मिळाली. या सत्तासंघर्षात सुरतनंतर आसाममधील गुवाहटीत आमदारांचा मुक्काम ठरला. गुवाहटी ते मुंबई असा प्रवास करत ते सत्तेत विराजमान झाले. आता, पुन्हा एकदा मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील ५० आमदार गुवाहटीला जात आहेत.
शिवसेना ठाकरे गटाकडून मध्यावधीच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठीच ते जात असून गुवाहटीतील सत्तानाट्यवेळी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचीच ते भेटही घेणार आहेत. गुवाहाटीच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एका विशेष पूजेचं आयोजन करण्यात आले आहे. सत्तांतराच्या काळात जी पूजा झाली त्याच पद्धतीची ही पूजा असणार आहे. महाराष्ट्रात सरकार बनवल्यानंतर पुन्हा एकदा तुझ्या दर्शनाला येईन असं साकडं एकनाथ शिंदे यांनी घातलं होते. म्हणूनच आता शिंदे आणि आमदार गुवाहाटीला जात आहे. या दौऱ्याची पूर्वतयारी सुरू असून जाण्या येण्याचं नियोजन आखलं जात आहे.
शिंदे गट येत्या २६ आणि २७ तारखेला मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांचा दौरा निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आमदारांसह २१ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी दौरा ठरला होता. मात्र, व्यक्त कारणास्तव तो दौरा रद्द झाल्यानंतर आता पुढची तारीख २६ नोव्हेंबर अशी ठरली आहे.