Join us

तुटलेल्या चेंबरमुळे पाय गटारात; दहिसर मेट्रो स्थानकाजवळील फूटपाथच्या गटाराची दुरुस्ती कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:41 AM

दहिसर मेट्रो स्थानक परिसरातील फूटपाथच्या गटारावरील चेंबरच्या लाद्या उखडल्या आहेत.

मुंबई: दहिसरमेट्रो स्थानक परिसरातील फूटपाथच्या गटारावरील चेंबरच्या लाद्या उखडल्या आहेत. दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसात येथे कंबरेपर्यंत पाणी साचत असून, तुटलेल्या चेंबरमध्ये पडून अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल दहिसरकरांनी केला आहे.

एमएमआरडीएकडूनमेट्रो २ ए प्रकल्पासाठी दहिसर येथील आनंदनगर स्थानकाजवळील मुख्य रस्त्याची रुंदी वाढवून अठरा फूट केली होती. परिणामी मुख्य रस्त्याची रुंदी कमी झाली. मेट्रो स्थानकांच्या आसपासच्या मुख्य रस्त्याच्या फूटपाथजवळ अंतरावर सहा फूट लांबी आणि अडीच फूट रुंदीच्या कालवा बनवून त्यावर लोखंडी चौकटीत लादी बसवून त्याला गटाराच्या चेंबरला जोडले आहे. या अनेक चेंबरवरच्या लाद्या उखडलेल्या असून, काही ठिकाणी लोखंडी फ्रेम तटलेली आहे..

रास्ता रोको आंदोलनाचा इशारा-

आनंद नगर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमिन कर्णा यांनी सांगितले की, मेट्रो स्थानकांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून, प्राधिकरण अधिकाऱ्यांना या फूटपाथवरील तुटलेले चेंबर्स का दिसत नाही? प्रशासनाने येथील रस्त्याच्या फूटपाथवरील समस्या पावसाआधी तातडीने सोडविली नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

१) एमएमआरडीए प्राधिकरण किंवा पालिकेने नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पावसाळ्याआधी चेंबरवर लोखंडी चौकटी व लादी दुरुस्तीचे काम तत्काळ करावे, अशी मागणी दहिसरकरांनी केली आहे.

२)  या कामाची जबाबदारी पालिकेची असल्याचे एमएमआरडीए प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम एमएमआरडीए प्राधिकरणाचे असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे ही दुरुस्ती कोण करणार, असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश पंड्या यांनी केला.

पावसाळ्यात धोका-

दरवर्षी पावसाळ्यात आनंद नगर वसाहतीत व मेट्रो स्थानकापासून उड्डाण पुलापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी साचते. अन्य मार्ग नसल्याने या फूटपाथवरून जपून चालावे लागते. नवीन फूटपाथ पूर्णपणे पाण्याखाली जातो. या चेंबरमध्ये पडून अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? प्रशासन नुकसानभरपाई देणार काय ? असा सवाल पंड्या यांनी केला.

टॅग्स :मुंबईदहिसरएमएमआरडीएमेट्रो