दुकानातील बरणी फोडली म्हणून चिमुरडीचा तोडला अंगठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:02 AM2018-03-23T00:02:08+5:302018-03-23T00:02:08+5:30
चायनीजच्या दुकानातील बरणी फोडली म्हणून चायनीज दुकान मालकाने ११ वर्षांच्या चिमुरडीचा अंगठा तोडल्याची घटना गोवंडी बैंगनवाडी परिसरात घडली. शिफा तुफेल अहमद शेख असे जखमी मुलीचे नाव असून, तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई : चायनीजच्या दुकानातील बरणी फोडली म्हणून चायनीज दुकान मालकाने ११ वर्षांच्या चिमुरडीचा अंगठा तोडल्याची घटना गोवंडी बैंगनवाडी परिसरात घडली. शिफा तुफेल अहमद शेख असे जखमी मुलीचे नाव असून, तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोवंडी बैंगनवाडी परिसरात शिफा आईवडिलांसोबत राहते. मंगळवारी ती मैत्रिणीसह चायनीजच्या दुकानासमोर फुग्यासोबत खेळत होती. खेळताना फुगा चायनीजच्या दुकानात गेला. फुगा आणण्यासाठी ती दुकानात गेली. त्याचदरम्यान फुगा घेत असताना तेथील मिठाची बरणी फुटली. याच रागात मालकाने हातातील कांदा कापण्याच्या चाकूने तिच्या हातावर वार केले. यामध्ये तिचा अंगठा तुटून ती बेशुद्ध झाली. त्यामुळे घाबरून मालकाने तेथून पळ काढला.
स्थानिकांच्या मदतीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. शिफाच्या आईच्या तक्रारीवरून चायनीज दुकान मालकाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तो पसार असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पगारे यांनी दिली.