संजय निरुपम यांची टीका; नगरसेवकांच्या लसीकरण केंद्रांवर प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लसीकरण मोहिमेवरून मुंबई महापालिकेच्या कारभारावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली आहे. पालिकेच्या नगरसेवकांना लसीकरण केंद्र उघडण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेवक मंडळी चमकोगिरी आणि राजकारण करण्यातच गुंतल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.
मुंबईत लसीकरणाच्या नावाखाली राजकारण सुरू असल्याचे सांगत निरुपम म्हणाले की, नगरसेवकांच्या लसीकरण केंद्रांनी नवीनच राजकारण सुरू झाले आहे. आपापल्या भागातील राजकारण आणि चमकोगिरीत नगरसेवक अडकले आहेत. लसींच्या मात्रा किती आहेत, लसीकरणाचे काम कसे पार पडेल, या प्रश्नांपेक्षा लसीकरण केंद्राचे उद्घाटन कोण करणार, याचीच चिंता संबंधितांना लागली आहे. मुंबई महापालिका इतकी असहाय आहे का, अशी खंतही निरुपम यांनी व्यक्त केली.
लसीकरणासाठी नागरिकांना रोज दारोदार भटकावे लागत आहे. १८ ते ४५ या वयोगटातील लोकांना तर लस मिळत नसल्याने युवा वर्ग अस्वस्थ आहे. ४५ च्या वरच्या लोकांना भटकंती करावी लागत आहे. लाखो लोक लसीची दुसरी मात्रा मिळावी म्हणून प्रतीक्षेत आहेत; पण लसीचा कुठेच पत्ता नाही. खासगी रुग्णालयेसुद्धा मुंबई महापालिकेकडे रोज लसींची मागणी करत आहेत; पण त्यांच्या पदरीसुद्धा निराशाच येत असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.