सणासुदीच्या काळात चणाडाळ महागली

By admin | Published: September 1, 2016 04:09 AM2016-09-01T04:09:29+5:302016-09-01T04:09:29+5:30

बाप्पाच्या आगमनासाठी सध्या सगळी मुंबई सजत आहे. बाप्पाच्या सेवेसाठी अनेकांनी अनंतचतुर्दशीपर्यंतचे बेतदेखील आखले आहेत.

Chanadal Mahagali during festivity | सणासुदीच्या काळात चणाडाळ महागली

सणासुदीच्या काळात चणाडाळ महागली

Next

मुंबई : बाप्पाच्या आगमनासाठी सध्या सगळी मुंबई सजत आहे. बाप्पाच्या सेवेसाठी अनेकांनी अनंतचतुर्दशीपर्यंतचे बेतदेखील आखले आहेत. पण ऐन सणासुदीच्या काळात चणाडाळीचे भाव वाढल्यामुळे बाप्पाच्या लाडवाच्या नेवैद्यात काटकसर करण्याची वेळ सामान्य नागरिकांवर येणार आहे. त्यातल्या त्यात श्रावण असूनही भाज्यांची आवक वाढल्याचे दर आवाक्यात आल्याचे थोडे समाधान मात्र गृहिणींना आहे.
गणेशोत्सवाला अगदी काहीच दिवस उरले आहेत. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी नैवेद्य आणि प्रसादाची तयारी गृहिणींनी सुरू केली आहे. पण ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडतो, यंदाही त्याला अपवाद नाही. यंदा भाज्यांच्या दरांनी गृहिणींना काहीसा दिलासा दिला असताना चणाडाळीने मात्र त्यांना चांगलेच वेठीस धरले आहे. बेसनाचे लाडू, बेसन बर्फी, पुरणपोळी, कटाची आमटी असे पारंपरिक पदार्थ बनविताना चणाडाळ गरजेची असते. पण नेमके याच दिवसात चणाडाळ महागल्याने अनेकींनी चणाडाळीकडे पाठ फिरवत रेडिमेड पदार्थांना पसंती दिली आहे. विशेष म्हणजे कडधान्यांचे भावही बऱ्यापैकी आवाक्यात आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणी कडधान्यांचे भाव वेगवेगळे पाहायला मिळत आहेत. चणाडाळीच्या दराबाबतीतही हाच प्रकार समोर आला आहे. उपनगरात कडधान्य आणि चणाडाळीचे भाव कमी असून शहरातील काही दुकानांमध्ये चणाडाळीने शंभरी पार केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महागलेल्या भाज्यांचे दर मात्र समाधानकारक आहेत. पाऊस पडल्यामुळे भाज्यांची आवक चांगली असल्याचे अनेक भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात भाज्यांचे दर असेच राहिले तर गृहिणींना बजेट जुळवणे सोपे होईल, असे गृहिणी सांगतात. (प्रतिनिधी)


गोडधोड करताना विचार
महागाई आता काही नवी राहिली नाही. सणासुदीच्या काळात तर भाव वाढतातच. सध्या चणाडाळ महागली आहे. त्यामुळे गोडधोडाचे पदार्थ गणेशोत्सवाच्या काळात बनवताना विचार करावा लागणार आहे.
- सविता प्रभू, गृहिणी

बजेट जुळवणे कठीण
आॅगस्टपासून सणांना सुरुवात होते. यादरम्यान भाज्या, किराणा मालात खूप फरक पडतो. दुकानदारांना किराणा स्वस्त झाला असे वाटत असेल. पण सणांच्या या दिवसात बजेट जुळवणे कठीणच होते.
- रोहिणी तांबे, गृहिणी

कडधान्याचे भाव स्थिर
गेल्या वर्षीच्या तुलनेत कडधान्याचे भाव कमी झाले आहेत आणि येत्या काही दिवसांतही कडधान्याचे भाव स्थिरच असतील, असा अंदाज आहे. महागाईचा उच्चांक गाठलेली तूरडाळही आता बऱ्यापैकी कमी किमतीत आहे.
- गुप्ता स्टोअर्स, भांडुप (पू.)

चणाडाळ घेताना धाकधूक
सणासुदीच्या काळात कडधान्यांचे भाव वाढतात. पण यंदा त्यामानाने दर वाढले नाहीच. उलट कमी झाले आहेत. पण चणाडाळ मात्र महाग झाली आहे. त्यामुळे चणाडाळ घेताना गृहिणी विचार करत आहेत.
- पटेल स्टोअर्स, दादर (प.)

Web Title: Chanadal Mahagali during festivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.