दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 03:56 PM2020-10-15T15:56:14+5:302020-10-15T15:56:37+5:30
Chance of heavy rains : कमी दाबाचे क्षेत्र
मुंबई : दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या दक्षिण कोकणावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. पुढील ४८ तासांत हे क्षेत्र उत्तर पूर्व अरबी समुद्रासह दक्षिण गुजरातच्या किनारी दिशेला सरकेल. यानंतर त्याचा जोर कायम राहील. हवामानातील या बदलाचा परिणाम म्हणून दक्षिण कोकण आणि आसपासच्या घाट माथ्यावर प्रति दिन २० सेंटीमीटर पाऊस होईल. थोडक्यात दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१६ ऑक्टोबर रोजी कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. दक्षिण गुजरातच्या किनारी प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. या काळात मध्य महाराष्ट्रात ताशी ३० किमी वेगाने वारे वाहतील. महाराष्ट्र, दक्षिण गुजरात आणि गोव्याच्या किनारी ताशी ३५ किमी वेगाने वारे वाहतील. कदाचित हा वेग ताशी ७० किमीच्या आसपासही जाईल, अशी शक्यता आहे. दरम्यान १८ ऑक्टोबरपर्यंत समुद्र खवळलेला राहील. मच्छिमारांनी समुद्रात उतरु नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
------------------------
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या दक्षिण कोकण प्रदेशात अद्यापही कमी दाबाचे क्षेत्र कायम
पुढील ४८ तासात महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता वाढेल
हा पट्टा पश्चिम- वायव्येकडे सरकत जाऊन तीव्र स्वरूपाचा होईल
------------------------
पावसाच्या माऱ्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भात, केळी, पपई आणि इतर फळबागा, शेवगा आणि भाज्यांचे नुकसान होईल.
मुसळधार पावसामुळे कच्च्या बंधाऱ्यांचे नुकसान होईल.
सखल भागांमध्ये पूर, पाणी साचणे, वाहतुकीत अडथळा, भूस्खलन होईल आणि पाणी साचेल. तसेच रस्ते ओले आणि निसरडे होतील.
अतिवृष्टीमुळे नाल्यांमध्ये अडथळे येऊन अचानक पूरस्थिती निर्माण होईल.