महापालिका निवडणुका शिंदे गटासोबत लढण्याची शक्यता - आशिष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 06:41 AM2022-08-14T06:41:27+5:302022-08-14T06:41:57+5:30
Ashish Shelar : मुंबई प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर ते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली.
- सुरेश भुसारी
नवी दिल्ली : मुंबई व ठाणे महापालिका निवडणुका शिवसेनेच्या शिंदे गटासोबत लढण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई प्रदेश भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली.
मुंबई प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर ते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. यात प्रामुख्याने नव्याने महाराष्ट्रात स्थापन झालेल्या सरकारमध्ये समन्वय कसा साधायचा व येत्या महापालिका निवडणुकांवर चर्चा झाल्याचे आमदार शेलार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी प्रामुख्याने मी दिल्लीत आलो आहे. यावेळी महापालिका निवडणुकांच्या नव्या रणनीतीवरही चर्चा झाली. मुंबई निवडणूक शिंदे गटासोबत निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, ही घोषणा मी करू शकत नाही; परंतु आगामी महापालिका निवडणुका शिंदे गटाला सोबत घेऊन लढविण्याची शक्यता अधिक आहे.
महाराष्ट्रात एक नवे सरकार सत्तारूढ झाले आहे. भाजप व शिंदे गटात समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. यासाठी कोअर समितीमध्ये चर्चा होईल, असेही आमदार शेलार यांनी सांगितले.