राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:10 PM2023-11-27T12:10:56+5:302023-11-27T12:11:38+5:30
संध्याकाळी मुंबई शहर उपनगरात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाच काही ठिकाणी गारपिटीनेही तडाखा दिला आहे. रविवारच्या तडाख्यानंतर सोमवारी देखील राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सुधारला असून मुंबईतील प्रदूषण कमी झाले आहे. शिवाय सोमवारी संध्याकाळी मुंबई शहर उपनगरात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
२७ नोव्हेंबर
पाऊस - मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात जोरदार, मुंबईसह कोकणातील सर्व ७ + खान्देशसह मध्य महाराष्ट्रातील १० अशा १७ जिल्ह्यात मध्यम, पावसाची शक्यता जाणवते.
गारपीट - विदर्भातील सर्व ११(विशेषतः अकोला, बुलढाणा, वाशिम) व मराठवाड्यातील ६ जिल्हे (छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड व नांदेड) अशा एकूण १७ जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता जाणवते.
२८ नोव्हेंबर
पाऊस - विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता
गारपीट - महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता नाही.
२९ व ३० नोव्हेंबर
पाऊस - संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता
गारपीट - शक्यता नाही.
१ डिसेंबर
प्रणाली विरळ होवून वातावरण निवळण्याची जाणवते.
२ डिसेंबर
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता असुन बांगलादेश ब्रम्हदेशकडे मार्गस्थ होण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही. दरम्यान हळूहळू थंडीची शक्यता जाणवते.