धावपटूंना मिळणार चुंबकीय पदक, प्रेरित करणा-या व्यक्तीचा सन्मान करण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 11:46 PM2018-01-11T23:46:45+5:302018-01-12T17:23:33+5:30
आशिया खंडातील सर्वात प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेची अधिकृत घोषणा गुरुवारी मुंबईत करण्यात आली.
मुंबई : आशिया खंडातील सर्वात प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेची अधिकृत घोषणा गुरुवारी मुंबईत करण्यात आली. यंदाचे १५वे वर्ष असलेल्या या मॅरेथॉनमध्ये एकूण ४४ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. तरी धावपटूंना देण्यात येणारे पदक यंदाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करणा-या सर्व धावपटूंना स्पर्धा आयोजकांकडून पदक मिळते. यंदा ४२ किमी अंतराची मुख्य मॅरेथॉनच्या यशस्वी धावपटूंना मिळणारे पदक अत्यंत वेगळे असून हे चुंबकीय आहे. प्रथमदर्शी साधारण दिसणारे हे पदक प्रत्यक्षात मात्र दोन भागांमध्ये विभाजीत असून या पदकाचे दोन्ही भाग चुंबकाने चिकटलेले असतील.
या हटके कल्पनेमागचा उद्देश आयोजकांनी सांगितला की, धावपटूंना मिळणा-या पदकाच्या एका भागावर शर्यत पूर्ण केल्याचे, तर दुस-या भागावर प्रेरित केलेल्याचे उल्लेख करण्यात आले आहे. यामुळे धावपटू एक पदक स्वत:कडे ठेवून, दुसरे पदक मॅरेथॉन धावण्यास प्रेरित करणा-या व्यक्तीस देऊन आभार मानू शकतो. विशेष म्हणजे असा हटके प्रयोग करणारी मुंबई मॅरेथॉन जगातील पहिली स्पर्धा ठरली असून सर्वच स्पर्धकांना ही बाब अभिमानास्पद वाटेल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.
मुंबई मॅरेथॉनमध्ये ३० देशांचे अव्वल धावपटू सहभागी होणार असून भारताची मदार आशियाई मॅरेथॉन जेतेपद पटकावणारा टी. गोपी आणि नितेंद्रसिंग रावत यांच्यावर असेल. त्याचवेळी महिलांमध्ये आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत स्टिपलचेस गटात सुवर्ण जिंकणा-या सुधा सिंगवर भारताच्या आशा असतील.