डान्स पे चान्स मारले

By admin | Published: April 28, 2015 10:36 PM2015-04-28T22:36:11+5:302015-04-28T22:36:11+5:30

आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून ओळखल्या जाणारी नृत्य ही कला दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत असल्याचे दिसून येते.

Chance struck dance | डान्स पे चान्स मारले

डान्स पे चान्स मारले

Next

प्राची सोनवणे ल्ल नवी मुंबई
आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून ओळखल्या जाणारी नृत्य ही कला दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत असल्याचे दिसून येते. या क्षेत्रातल्या नृत्य कलाकारांना, नृत्य शिक्षकांना, दिग्दर्शकांना तसेच ही कला शिकणाऱ्या इच्छुकांना यासाठी जीवापाड मेहनत घ्यावी लागते. मेहनतीबरोबरीनेच पैसा असणे ही देखील महत्त्वाची बाब आहे. शहरातील डान्स अकादमीची भरमसाट फी, त्यांचे विविध कपडे, साहित्य या सर्वच गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांनी ही कला शिकावी तरी कशी? की शिकूच नये? असा प्रश्न उद्भवतो.
नृत्य आणि संगीत हे रक्तातच आहे. न नाचणारा मनुष्यही एखाद्या गाण्याच्या तालावर नक्कीच थिरकतो. आपल्या देशात दहा प्रकारच्या शास्त्रीय नृत्यशैली, दोनशेहून अधिक लोकनृत्यांचा खजिना आहे. हल्ली यातूनच विविध नृत्य प्रकारांची निर्मिती देखील केली जाते. शृंगार, हास्य, रौद्र, करूण, बीभत्स, भयानक, वीर, अद्भुत, शांत अशा नऊ रसांचे एकत्रिकरणही आपल्याला नृत्याद्वारेच पहायला मिळते.
आपल्या मुलीने शास्त्रीय नृत्य शिकावे असे वाटणाऱ्या पालकांची संख्या आता वाढते आहे. आपल्या महाराष्ट्राची स्वत:ची अशी शास्त्रीय नृत्यशैली नाही. तरी देखील इथे प्रत्येक शैली शिकण्याची सोय आहे. हल्ली एक व्यायाम म्हणूनही नृत्य कलेचा वापर केला जातो. ही कला शिकल्यावर मात्र फारशा नोकरीच्या संधी नसल्याने मुलींना यामध्ये करिअर करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा नसतो. यावर उपाय म्हणून मग एक व्यवसाय म्हणून कलेचा वापर केला जातोय, आपली स्वत:ची संस्था उभारून तिलाच उपजीविकेचे माध्यम केले जाते. नृत्य कलेबरोबरच त्याचा आता बाजारही झाल्याचे चित्र दिसून येते.
नवी मुंबईसारख्या मेट्रोपोलिटीयन सिटीमध्ये नृत्य कला शिकण्यासाठी इच्छुकांना मुंबईची वाट धरावी लागते. यामागचे कारण असे की शहरात मोजक्याच डान्स अकादमी आहेत आणि त्यातही त्यांची वर्षभराची फी, इतर खर्च हे सर्वसामान्यांना न परवडण्यासारखे असते. नवी मुंबईसारख्या शहरात हक्काची कला अकादमी असावी असे सर्व कलाकारांना वाटते. नवी मुंबई पालिकेकडून कलाकारांच्या अपेक्षा आहेत. येथील काही कलाकारांशी चर्चा केल्यावर असे आढळून आले की त्यांना त्यांच्या कलेसाठी एक सांस्कृतिक भवन उपलब्ध करून दिले जावे. माफक दरात नृत्य शिकता यावे यासाठी पालिकेने स्वतंत्र विभागाची नेमणूक करावी.

२९ एप्रिल हा बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन - जॉर्जेस नोव्हर यांचा जन्मदिवस... यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जगभरात २९ एप्रिल हा दिवस नृत्य दिवस म्हणून पाळला जातो. युनेस्कोशी संलग्न असलेली आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थेच्या वतीने १९८२ सालापासून नृत्य दिवस साजरा केला जातो. यानिमित्त जगप्रसिध्द नृत्य कलावंतांचा आणि वर्षभरातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलावंतांचा सत्कार केला जातो.

मार्गदर्शकाची गरज
नृत्यशैली शिकण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक मिळणे खूप गरजेचे आहे. मी स्वत: एक नृत्य शिक्षिका असून गरजू इच्छुक मुलांना अल्पदरात कला शिकता यावी यासाठी प्रयत्न करते. नवी मुंबईसारख्या शहरात असे अनेक कलाशिक्षक आहे की ज्यांच्याकडे कला असूनही शिकण्यासाठी विद्यार्थी नाहीत. याला कारण म्हणजे या कलाकारांकडे दुर्लक्ष केले जाते.
- नीला दामले, नृत्यशिक्षिका

उत्तम रसिकांची अपेक्षा
नवी मुंबई शहरात नृत्य कला शिकणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढत असली तरी, रसिकांची संख्या मात्र फारच कमी आहे. पालकांनी आपल्या मुलांना एक उत्तम कलाकार करण्याबरोबर एक चांगला रसिकही केले पाहिजे. माझी नृत्य कला कायमस्वरूपी जपता यावी यासाठी मी स्वत: एक डान्स इन्स्टिट्यूट चालवतो.
- दुर्गेश राजपूत, नृत्य दिग्दर्शक

शहरात डान्स शो व्हावेत!
कलाकारासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला त्याची कला सादर करण्याची संधी दिली पाहिजे. एखाद्या संधीचेही सोने करता येते असा आम्हा कलाकारांचा विश्वास आहे. मला माझी कला सादर करण्यासाठी या नवी मुंबईत संधी मिळत नसल्याने शहराबाहेर जाऊन कला सादर करावी लागते याची खंत वाटते. शहरात अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रेक्षकांनाही चांगली संधी दिली जावी.
- तेजस्विनी सोलट, नृत्य कलावंत

कथासंग्रहाचे प्रकाशन
मुंबई : महाराष्ट्र सेवा संघ व राजेंद्र प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ एप्रिल रोजी ‘निवडक धनंजय विज्ञान कथा’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंडच्या सभागृहात पार पडला. या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. बाळ फोंडके व सुबोध जावडेकर यांच्या उपस्थितीत झाले. या कथासंग्रहातील कथा या ‘धनंजय’ मासिकामधून अरुण नेरूरकर यांनी संपादित केल्या आहेत.

Web Title: Chance struck dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.