Join us

अपघातांची शक्यता वर्तवली, तरी रेल्वे ढिम्मच; मुंबई रेल प्रवासी संघाने दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:35 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि डोंबिवली परिसरात वाढत्या गर्दीमुळे रेल्वेच्या अपघातांत वाढ होताना दिसत आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि डोंबिवली परिसरात वाढत्या गर्दीमुळे रेल्वेच्या अपघातांत वाढ होत असून, यासंदर्भातील धोक्याची सूचना मुंबई रेल प्रवासी संघातर्फे फेब्रुवारी महिन्यातच रेल्वेला देण्यात आली होती. शिवाय, उपाय योजनाही सुचविण्यात आल्या होत्या. मात्र, नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे.

डोंबिवलीकडून ठाण्याकडे सकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी असते. डोंबिवली सोडल्यास कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा येथे कोणतेही व्यावसायिक केंद्र नाही. मात्र, येथील लोकवस्ती प्रचंड वाढली आहे. डोंबिवलीकडून कळवा स्टेशनला लोकल येईपर्यंत लोकलमध्ये प्रवासी संख्या सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० एवढी प्रचंड वाढते. तसेच कळवा आणि मुंब्रा येथे खाडीवर एक मोठे वळण आहे. त्यामुळे सगळा लोड एका बाजुला येतो. मुंब्रा आणि कळवामध्ये ६ मिनिटांचे अंतर आहे. त्यामध्ये एवढया गर्दीमध्ये तग धरणे प्रवाशांना अडचणीचे ठरते आणि अपघाताचा धोका वाढतो, अशी माहिती मुंबई रेल प्रवासी संघातर्फे देण्यात आली.

नवीन ठाणे दिवा ट्रॅकचा फायदा कोणाला होतो ? कोणीच बोलत नाही. नवीन दोन ट्रॅक झाल्यानंतर नवीन लोकल वाढविणे अपेक्षित होते. मात्र मध्य रेल्वेने लोकलऐवजी मेल चालविणे सुरू केले.

कळवा-ऐरोली लिंक ? 

कळवा-ऐरोली लिंकसारखे प्रकल्प रखडल्याचा फटका डोंबिवली- कल्याणमधील प्रवाशांना बसतो आहे.

प्रवाशांनी सुचविल्या उपाययोजना-

१) रेल्वे मार्गांचा विस्तार करा.

२) ठाणे, कर्जत, कसारा मार्गांवर अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवा.

३) गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्या.

४) एसी लोकल चालवितानाच साध्या लोकलच्या फेऱ्यांतही वाढ करा.

५) उन्नत रेल्वे मार्ग बांधणे आणि कार्यालयांच्या वेळा बदलणे.  ६) टिटवाळा - बदलापूर लोकल पंधरा डब्यांच्या करा.

७) छोट्या फलाटांवर लोकल दोनवेळा थांबवा.

८) लोकलच्या फेऱ्या वाढावा.

९) एसी लोकलला साध्या लोकलचे डबे जोडा.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेरेल्वे प्रवासीराज्य सरकार