मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सूरज पांचोलीवरील खटल्यास दिलेली स्थगिती वाढवण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे ५ मे रोजी सत्र न्यायालय सूरज पांचोलीवर आरोप निश्चित करण्याची शक्यता आहे.जिया खानची आई राबिया खान यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी पांचोलीवरील खटल्यास स्थगिती दिली होती. जियाची हत्या करण्यात आल्याचा तिच्या आईचा संशय आहे, तर सीबीआयने ही आत्महत्या असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत खटल्यास दिलेली स्थगिती वाढवण्यात यावी, अशी विनंती राबिया खान यांचे वकील प्रकाश झा यांनी न्या. नरेश पाटील व न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठाला केली. मात्र खंडपीठाने खटल्यास स्थगिती देण्यास नकार देत या याचिकेवरील सुनावणी ७ जून रोजी ठेवली आहे. ‘स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत तुम्ही (राबिया खान) शंका निर्माण केली म्हणून उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केला. सीबीआयनेही ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. आता त्यांनी केलेल्या तपासावरही तुम्ही आक्षेप घेत आहात आणि एसआयटी स्थापण्यास सांगत आहात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यामुळे आम्ही खटल्यास स्थगिती देणार नाही,’ असे खंडपीठाने म्हटले. सोमवारच्या सुनावणीत सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी या खटल्यात विशेष वकील नियुक्त करण्याच्या सरकारच्या अधिसूचनेला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती खंडपीठाला दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापण्यात यावी आणि जिया अमेरिकन नागरिक असल्याने एफबीआयला एसआयटीला मदत करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राबिया यांनी याचिकेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
सूरजवर आरोपनिश्चितीची शक्यता
By admin | Published: May 03, 2016 3:03 AM