व्हिडीओकॉन प्रकरणी कोचर दाम्पत्याला अटक, ICICI बँकेकडून ३,२५० कोटींचे घेतले होते कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:50 AM2022-12-24T05:50:39+5:302022-12-24T05:51:08+5:30
व्हिडीओकाॅन कर्ज घाेटाळ्याप्रकरणी सीबीआयने केली अटक.
नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा काेचर आणि त्यांचे पती दीपक काेचर यांना व्हिडीओकाॅन कर्ज घाेटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.
आयसीआयसीआय बँकेने २०१२ मध्ये व्हिडीओकाॅन समूहाला ३,२५० काेटी रुपयांचे कर्ज दिले हाेते. ते मंजूर करणाऱ्या समितीमध्ये चंदा काेचर सदस्य हाेत्या. कर्जाची रक्कम व्हिडीओकाॅन समूहाने दीपक काेचर यांच्या कंपन्यांकडे बेकायदा वळविल्याचा आराेप आहे.
आपल्या पतीचे धूत व व्हिडीओकॉनशी घनिष्ठ व्यावसायिक संबंध आहेत हे चंदा कोचर यांनी कर्जमंजुरी समितीच्या निदर्शनास आणले नाही किंवा त्यांनी त्या मंजुरी प्रक्रियेपासून स्वत:ला दूरही ठेवले नाही, असा आराेप झाला हाेता. त्यानंतर त्यांनी ऑक्टाेबर २०१८मध्ये राजीनामा दिला हाेता. चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन समूहाचे वेणुगोपाल धूत यांच्यासह न्यू पॉवर रिन्युएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांवर गुन्हा दाखल झाला होता.