‘चंद्रलोक’ जपतेय शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा!

By admin | Published: June 23, 2017 01:18 AM2017-06-23T01:18:17+5:302017-06-23T01:18:17+5:30

वाहनांसाठी पार्किंग, लहान मुलांसाठी इनडोअर गेम्स, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, बगिच्यात विविध झाडे, तुळस बाग, पुरेसे

'Chandlok' is a cultural and cultural heritage! | ‘चंद्रलोक’ जपतेय शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा!

‘चंद्रलोक’ जपतेय शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा!

Next

सागर नेवरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहनांसाठी पार्किंग, लहान मुलांसाठी इनडोअर गेम्स, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, बगिच्यात विविध झाडे, तुळस बाग, पुरेसे प्रकाशदिवे आणि बोअर वेलच्या पाण्याचा वापर अशा सेवा-सुविधांनी मुलुंड पूर्वेकडील ‘चंद्रलोक को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’ नटली आहे. महत्त्वाचे म्हणजे याव्यतिरिक्त ‘ग्रंथ आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे सोसायटीने वाचन परंपरा जपली असून, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसाही जपला आहे. विशेषत: सोसायटीचा अर्धाअधिक कारभार महिला करत असून, सोसायटीने आता सोलार आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पही हाती घेतला आहे. एकूणच सोसायटीची वाटचाल ‘स्वयंपूर्णते’कडे होत असून, ही सोसायटी तंटामुक्त सोसायटी म्हणूनही ओळखली जाते.
मुलुंड पूर्वेकडील ‘चंद्रलोक को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’मध्ये बहुढंगी व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य आहे. यात डॉक्टर्स, इंजिनीअर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, व्यावसायिक, कॉम्प्युटर इंजिनीअर असा पेशा असलेल्या रहिवाशांचा समावेश आहे. २००१ साली सोसायटीचे बांधकाम पूर्ण झाले. सोसायटीची इमारत सात मजली असून, येथे ४२ कुटुंब वास्तव्य करीत आहेत. सोसायटीच्या आवारात पार्किंगची व्यवस्था असून, १२ सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेसाठी तैनात आहेत. दोन सुरक्षारक्षक आणि बगिचाची देखरेख करणारे कर्मचारीही कार्यरत आहेत.
सोसायटीच्या परिसरात तुळस बाग आहे. जवळजवळ ५० ते ६० छोटीमोठी तुळशीची रोपे येथे आहेत. तुळस बाग हे सोसायटीचे वैशिष्ट्य आहे. सायंकाळच्या वेळी सोसायटीतील आजी-आजोबांचा तुळशी बागेच्या कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगतो. तसेच फळझाडे, वनस्पती झाडे, मसाल्याची झाडे आणि फुलझाडे येथे आहेत. या वर्षीच्या पावसाळ्यात येथील मोकळ्या जागेत आणखी एका बागेची मांडणी करण्यात येणार आहे. परिसरात आठ विजेचे दिवे आहेत. तसेच प्रवेशद्वाराजवळ दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांची मांडणी सोसायटीतील पराग बापट या सद्गृहस्थांनी सदस्यांच्या मदतीने स्वत:च केली आहे.
दरवर्षी १ मे रोजी पूजा आणि ३१ डिसेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमास सोसायटीतील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. सर्व धर्माचे सण-उत्सव येथे साजरे केले जातात. होळी, संक्रांत, चैत्रामध्ये हळदीकुंकू, सत्यनारायणाची महापूजा असे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. नवरात्रीमध्ये भोंडला हा महिलांचा पारंपरिक सण साजरा होतो. लहान मुलांचे नाच, गाणी आणि नाटक बसवून सादर केले जाते; शिवाय काही पुरुष व महिला या उत्तम गायक असल्याने या वेळी कार्यक्रमात रंगत आणली जाते, तर उत्तम निवेदक आणि नकलाकार ही सोसायटीला लाभलेली देणगी आहे. महिलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे भजनी मंडळ आहे.
सोसायटीमध्ये खेळाला पूरक वातावरण आहे. कॅरम, टेबल-टेनिस व बॅटमिंटनसारखे इनडोर गेम्सही खेळले जातात. लहान मुलांना सायकल चालवण्यासाठीदेखील जागा असून, परिसरात सायकल स्टँड आहे. ‘ग्रंथ आपल्या दारी’ हा शासनाचा उपक्रम असून, त्यातली एक पेढी सोसायटीमध्ये आहे. तसेच मुंबई ग्राहक पंचायत या उपक्रमात सोसायटीमधील ११ सदस्य जोडले गेले आहेत. यामुळे सोसायटीतील लोकांना दैनंदिन घरगुती साहित्यासाठी बाहेर जावे लागत नाही.
पाण्याचे नियोजन उत्तमरीत्या केले जाते. महापालिकेचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. परिसरात एक बोअर वेल असून, त्याचे पाणी शौचालयासाठी, गाड्या धुण्यासाठी आणि बागेसाठी वापरले जाते. थोडक्यात सांगायचे तर चंद्रलोक सोसायटी टँकरमुक्त आहे. सोसायटीच्या प्रत्येक सदस्यामध्ये पाणी बचतीसाठी जनजागृती केली जाते. नोटीस बोर्ड आणि
व्हॉटस्अ‍ॅप गु्रप बनवले गेले आहेत. त्यावर सोसायटीच्या सर्व
प्रकारच्या सूचना आणि माहिती दिली जाते.
कचऱ्याचे व्यवस्थापन करताना सुका कचरा आणि ओला कचरा अशा प्रकारे वेगळा केला जातो. यात महत्त्वाची बाब ही की प्लॅस्टिक कचऱ्यासाठीदेखील वेगळ्या कचराकुंडीचा वापर केला जातो. सोलार आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगवर सोसायटीचे काम सुरू आहे. सोसायटीच्या कमिटीमध्ये ९ सभासद असून, त्यात ४ महिला सभासदांचा समावेश आहे. सोसायटीच्या कमिटी टीमच्या महिला अध्यक्ष असून, सोसायटी तंटामुक्त आहे.

सहभागासाठी आवाहन
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘आमची सोसायटी, आमचं कुटुंब’ या उपक्रमात आपल्या गृहनिर्माण संस्थेला सहभागी व्हायचे असल्यास आपण lokmat.mahasewa@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकता.

Web Title: 'Chandlok' is a cultural and cultural heritage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.