ढगाळ हवामान, गगनचुंबी इमारतींमुळे सुपर पिंक मून पाहण्यात अडथळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरातील ढगाळ वातावरण, गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईकरांना सुपर पिंक मूनचे दर्शन मंगळवारी रात्री ८.३० नंतरच घडले. त्यातही अनेक ठिकाणी ढगाळ हवामानामुळे अनंत अडचणी आल्या.
मुंबईकरांना सहसा रात्री ७ नंतर चंद्राचे दर्शन होते. मंगळवारीही रात्री ७ नंतरच सुपर मूनचे दर्शन होईल, असे चित्र होते. प्रत्यक्षात मात्र रात्रीचे ८ वाजले, तरी मुंबईच्या आकाशात सुपर मूनचे दर्शन झाले नाही. परिणामी, सुरुवातीला खगोलप्रेमींची निराशा झाली. रात्री साडेआठनंतर मात्र पूर्व उपनगरात काही ठिकाणी सुपर पिंक मूनचे किंचित दर्शन घडले. मात्र, येथेही ढगाळ हवामानामुळे चंद्र ढगांआडच लपला होता. परिणामी, रात्रीचे साडेआठ वाजले तरी म्हणावे तसे चंद्राचे दर्शन घडले नाही.
रात्री साडेआठनंतर मात्र मुंबईच्या उपनगरात काही ठिकाणी सुपर पिंक मूनचे दर्शन घडले. मात्र, तोवर आलेल्या अडथळ्यांमुळे खगोलप्रेमींची निराशा झाली होती. रात्री पावणेनऊनंतर वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रातून सुपर पिंक मूनचे दर्शन खगोलप्रेमींना घेता आले. मात्र, येथेही चंद्र पुरेसा नीट दिसत नव्हता. चंद्राचे लाइव्ह दर्शन देत असतानाच चंद्राबाबतची माहिती विषद केली जात होती. प्रत्येक महिन्यात दिसणारा चंद्र, त्याची वैशिष्ट्ये, त्याची वेगवेगळी नावे, अशा अनेक घटकांची माहिती केंद्राकडून दिली जात होती. मात्र, रात्री ९ च्या आसपास पुन्हा ढगाळ हवामान गडद झाले. त्यामुळे मुंबईकरांना सुपर पिंक मूनचे दर्शन मनाप्रमाणे घेता आले नाही.
.......................