मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, प्रथम शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, यावर शिंदे गट ठाम आहे. बुधवारी फेसबुक लाइव्ह केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल झाले. यातच आता कट्टर शिवसैनिक असलेल्या ९२ वर्षांच्या चंद्रभागा आज्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर आल्याचे सांगितले जात आहे.
नवनीत राणांविरोधात केलेल्या हटके आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या ९२ वर्षांच्या शिवसेनेच्या फायरब्रँड आज्जी चंद्रभागा शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. आज्जी जवळपास तासभर मातोश्रीमध्ये होत्या. आजींना मुख्यमंत्री स्वतः भेटले की इतर कोणी? हे अद्याप समजलेले नाही. पण तासभर आजी मातोश्रीमध्ये होत्या, असे सांगितले जात आहेत.
परभणीच्या खासदारांसह पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली
एकीकडे परभणीच्या खासदारांसह अन्य पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली असतांना आजींना मात्र एन्ट्री मिळाली आहे. नवनीत राणांविरोधात शिवसेनेच्या आंदोलनावेळी चंद्रभागा शिंदे प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांद्रभागा शिंदे यांच्या घरी जाऊन भेटही दिली होती.
दरम्यान, ९२ वर्षीय आज्जींचे नाव चंद्रभागा गणपत शिंदे आहे. मुंबईतील शिवडी येथील त्या रहिवासी आहेत. अजूनही शिवडी नाक्यावर भाजीचा व्यवसाय करतात. पोलिसदूत म्हणून विभागात काम करतात आणि पोलिसांनाही सामाजिक कामात मदत करतात. आज्जींना दोन मुले आणि दोन नातवंडे आहेत. आजींना विचारले की, तुम्ही केव्हापासून शिवसैनिक आहात, तर त्या बाळासाहेबांपासून शिवसैनिक असल्याचे सांगतात. तसेच आजींचे शिवसेनेसोबतचे नातेही खास आणि तितकेच सलोख्याचे होते. बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांपैकी एक चंद्रभागा आज्जी एक आहेत.