चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 06:14 AM2018-12-21T06:14:36+5:302018-12-21T06:15:04+5:30
बलात्कार व हत्या प्रकरण : उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
मुंबई : आंध्र प्रदेशमधून मुंबईत नोकरीसाठी आलेल्या २३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या चंद्रभान सानपला विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले. सानपला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप नाही. तो समाजासाठी धोकादायक ठरू शकतो, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा कायम केली.
विशेष न्यायालयाच्या निर्णयाला चंद्रभान सानप (३०) याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. तर त्याला ठोठाविण्यात आलेली शिक्षा कायम करण्यात यावी, यासाठी राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात अर्ज केला. या दोन्ही याचिकांवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुरू होती. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला होता. गुरुवारी न्यायालयाने त्यावर निकाल दिला.
सानपच्या बाजूने पुरावे नाहीत. त्याचे वकील ते सादर करण्यास अपयशी ठरले. त्याला केलेल्या कृत्याचा पश्चात्तापही नाही. त्यामुळे त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण न्यायालयाने निकालपत्रात नोंदविले आहे. ३० आॅक्टोबर २०१५ रोजी विशेष न्यायालयाने सानपला बलात्कार व हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली २३ वर्षीय तरुणी ५ जानेवारी २०१४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनवर उतरली. ख्रिसमसच्या सुट्टीसाठी आंध्र प्रदेश येथे स्वत:च्या घरी गेलेली तरुणी पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी ५ जानेवारी रोजी पहाटेच लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनवर उतरली. स्टेशनबाहेर ती टॅक्सीची वाट पाहत होती. त्या वेळी सानपने तिला हेरून टॅक्सी ड्रायव्हरचा पेहराव करून अंधेरीत् येथे तिच्या हॉस्टेलमध्ये ३०० रुपयांत पोहोचविण्याचे खोटे आश्वासन दिले. ती टॅक्सीत बसली. त्यानंतर सानपने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. तिचे शव भांडुपच्या झाडीमध्ये फेकले. तिचे शव १६ जानेवारी २०१४ रोजी पोलिसांच्या हाती लागले. त्याच वर्षी सानपला पोलिसांनी नाशिक येथून अटक केली.
‘समाजासाठी धोकादायक’
‘सानपने तीनदा विवाह केला. त्याच्या कृत्यामुळे समाजाला मोठा धक्का बसला. तो समाजासाठी धोकादायक आहे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने सानपला विशेष न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली.