Join us

राज्य महामार्गांवर प्रवाशांसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहे उभारणार- चंद्रकांत (दादा) पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 4:16 PM

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करणार असल्याची घोषणा सार्वजानिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केली.

मुंबई : राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करणार असल्याची घोषणा सार्वजानिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केली. तसेच या स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपसारख्या अ‍ॅपवरही उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.वर्षा पवार- तावडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात पाटील यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राज्यातील प्रमुख महामार्गांवर स्वच्छतागृहांची उभारणी करावी, यासह महिला प्रवाशांच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधांच्या मागण्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांना दिले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.प्रामुख्याने महिला प्रवाशांसाठी महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशिन आणि सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा यामध्ये समावेश होता. मंत्री पाटील यांनी ही मागणी मान्य करत, महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले.महामार्गाच्या कडेला उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी स्वच्छतागृह उभारणाऱ्या संस्थेकडेच तीन वर्षांसाठी असेल. तसेच तसेच संबंधित व्यक्तीकडून स्वच्छतागृहांची देखभाल योग्य प्रकारे होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी महिला बचत गटाकडे देण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी. पी.जोशी, उपसचिव पी. के. इंगोले, संघटनेच्या उपाध्यक्षा सीमा देशपांडे, मुंबई विभागाच्या सचिव सुरेखा किणगावकर, अर्चना बक्षी, मंजू नायर आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :चंद्रकांत पाटील